नगर : रब्बीचे अवघे 21 टक्के कर्ज वाटप ! | पुढारी

नगर : रब्बीचे अवघे 21 टक्के कर्ज वाटप !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  यंदाच्या रब्बी हंगामासाठी जिल्हा बँकेला 1168 कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मात्र, दोन महिन्यांत आतापर्यंत जिल्हा बँकेतून केवळ 22 हजार 460 शेतकर्‍यांना 21 टक्के अर्थात 241 कोटी 25 लाखांचे कर्ज वाटप केले आहे.
जिल्ह्यात 1318 सहकारी सोसायट्या आहे. या संस्थेच्या मध्यस्थीने जिल्हा बँक ही शेतकर्‍यांना खरीप आणि रब्बीचा पीककर्ज पुरवठा करते. बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, सर्व संचालक मंडळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे हे बँकेतून शेतकर्‍यांना वेळेत कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील दिसतात.

त्यामुळेच आजही इतर बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेच्या कर्जालाच शेतकरी प्राधान्य देतो आहे. बँकेकडून वेळेवर व कमी कागदपत्रांत सुलभरित्या कर्ज मिळते. तसेच, वर्षभराच्या मुदतीत शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज परतफेड सवलतही आहेच. त्यामुळे जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची कामधेनू बनल्याचे वास्तव चित्र जिल्ह्यात उभे राहिलेले आहे.

खरिपासाठी 121 टक्के उच्चांकी कर्ज वाटप

दरवर्षी खरीप हंगामासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात पीककर्ज उचलताना दिसतात. खरिपासाठी जिल्हा बँकेला 2238 कोटींचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात बँकेने तीन लाख 64 हजार शेतकर्‍यांना 2716 कोटींचे पीककर्ज वाटप केले. उद्दिष्टाच्या तुलनेत हे कर्ज वाटप 121 टक्के इतके उच्चांकी झाल्याचे पाहायला मिळाले.

खरीप उचलल्याने रब्बी  कर्जाला अडचणी !

शेतकर्‍यांनी खरिपाचे उच्चांकी कर्ज उचलले आहे. हे कर्ज परत करण्यासाठी 31 मार्च ही मुदत आहे. ज्यांनी कर्ज घेतले, त्या क्षेत्रावर सोसायटी चढविली जाते. त्यामुळे ते कर्ज भरेपर्यंत नवीन कर्ज मिळू शकत नाही. याच कारणातून रब्बीचे केवळ 21 टक्के कर्ज वाटप होऊ शकल्याचे समजते.

ऊस लागवडीसाठीच अधिकचा कर्ज पुरवठा

रब्बी हंगामातील बाजरी, गहू अशा अन्य पिकांसाठी 31 डिसेंबरपर्यंतच रब्बीचे कर्ज वाटप केले जाते. मात्र, ऊस लागवडीसाठी कर्ज पुरवठा सुरू असतो. आडसाली ऊस लागवडीला एकरी 70 हजार रुपये, खोडव्याला एकरी 50 हजार रुपये आणि सुरू लागवडीला एकरी 57 हजारांचे कर्ज दिले जात आहे. बॅँकेतून बहुतांशी कर्ज पुरवठा हा ऊस लागवडीवरच केला जात आहे.

Back to top button