

संगमनेर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करताना वाहतुकीचे नियम मोडणार्या छोट्या-मोठ्या 17 हजार 139 वाहनांवर 'इंटरसेप्टर' या अत्याधुनिक प्रणालीच्या माध्यमातून एक वर्षात डोळसणे महामार्ग उपकेंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या पोलिस कर्मचार्यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत 2 कोटी 59 लाख 61 हजार 400 रुपयांचा दंड केला आहे. त्यापैकी 1 कोटी 23 लाख 50 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करून ज्यादा वेगाने वाहने चालविणार्या आणि वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांमध्ये धाक निर्माण केला आहे.
पुणे- नाशिक या दोन मोठ्या शहरांना जोडणार्या नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्ग हा दोन पदरी होता, तेव्हा मोठ्या प्रमाणात अपघाताचेप्रमाण वाढले होते. ते दूर करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले. त्यामुळे महामार्गावरून वाहने चालविताना वाहन, चालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात वाहने चालवित होते. वाहने भरधाव चालत असल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. महामार्गाने प्रवास करणार्या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावर होणार्या अपघातग्रस्तांना तत्काळ मदत व्हावी, याकरीता डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राची निर्मिती करून त्यासाठी स्वतंत्र सहाय्यक पोलिस निरीक्षक व इतर पोलिस कर्मचारी कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली होती.
पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने जाणार्या येणार्या वाहने तसेच वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहन चालकांवर कारवाई करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. म्हणून डोळसने महामार्ग पोलिससांच्या ताफ्यात इंटरसेप्टर सर्व सुविधांनी युक्त अत्याधुनिक प्रणालीयुक्त वाहन दाखल झाले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून धावणार्या छोट्या-मोठ्या वाहनांवरती करडी नजर ठेवणे, वाहतूक नियम मोडणार्यांवर दंडात्मक कारवाई करून ऑनलाईन स्वरूपात दंड आकारले.
पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्या येणार्या वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत करत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून या महामार्गाने प्रवास करणार्या वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि दंडातून मुक्ती मिळवावी, असे आवाहन डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दैनिक 'पुढारी' शी बोलताना केले आहे.