नगर : विनापरवाना आरागिरणी बंद ! | पुढारी

नगर : विनापरवाना आरागिरणी बंद !

नेवासा : पुढारी वृत्तसेवा  :  नगर जिल्ह्यातील बोगस व विनापरवना आरागिरण्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या संदर्भात कठोर निर्णय घेताना आपल्या कार्यक्षेत्रातील विनापरवाना असलेल्या आरागिरणी तात्काळ सिलबंद करण्याचे आदेश उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी सर्व वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना दिले आहेत.या निर्णयामुळे आता जिल्ह्यातील विनापरवाना सुरू असलेल्या आरागिरण्या आता बंद होणार आहेत.  नेवासा, राहाता, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, जामखेड या तालुक्यातील एकाही आरागिरणीला वनविभागाची परवानगी नाही. नगर जिल्ह्यातील सुरू असलेल्या बोगस व विनापरवाना आरागिरण्यांवर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचेकडे केली होती. गायके यांनी दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी या संदर्भात आपला तक्रार अर्ज दिलेला होता. त्यामुळे काही दिवसांपासून जिल्ह्यातील बेकायदा व विनापरवाना सुरू असलेल्या आरागिरण्या हा एक महत्वाचा प्रश्न म्हणून चर्चेत आलेला होता.

दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत काकासाहेब गायके यांच्या प्राप्त तक्रारीवर जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी काल मोठा निर्णय घेतला आहे.  माने यांनी जिल्ह्यातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना संबंधित तक्रार अर्जातील मुद्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील विनापरवाना असलेल्या आरागिरणी तात्काळ सिलबंद करावी, अन्यथा आपल्या कार्यक्षेत्रात विनापरवाना आरागिरणी चालु असल्यास पुढील काळात उद्भवणार्‍या पेचप्रसंगास आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल. सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीचा व कार्यवाहीचा सविस्तर अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

तक्रार अर्जावरून प्रशासनाने केली कारवाई

सामाजिक कार्यकर्त्यांच्या अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि वनविभागाने तत्काळ कारवाईची पाऊले उचलली आहेत. विनापरवाना सुरू असलेल्या आरागिरण्या आता बंद केल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रसंगी पोलिस प्रशासनाचीही मदत घेतली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींकडून स्वागत केले जात आहे.

Back to top button