नगर : ओढ्यांवर प्लॉट; बांधकाम परवानगीला ब्रेक | पुढारी

नगर : ओढ्यांवर प्लॉट; बांधकाम परवानगीला ब्रेक

नगर : नगर शहरात सावेडी, बोल्हेगाव, केडगाव, कल्याण रोड आदी उपनगरातील 41 ओढ्या नाले बुजवून अतिक्रमण केले आहे. ओढ्या नाल्यावर प्लॉट टाकण्यात आले आहे. ओढ्या नाल्यावरील खुल्या प्लॉटला बांधकामास परवानगी देऊ नये. तसेच, लेआऊटची पुनर्रचना करावी व ओढ्यांची रुंदी निश्चित करण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

तज्ज्ञांची समिती नेमणार

नगर विकास आरखड्यात झालेल्या चुका दुरूस्त कशा करता येतील. त्यासाठी सेवानिवृत्त नगर रचनाकारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी. त्या समितीमध्ये ज्येष्ठ वकील, इंजिनिअर आदींचा समावेश असावा. त्यांना नगर रचनाकार यांनी मदत करावी आणि चुका दुरूस्तीसाठी पर्याय शोधावा, अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.  सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चेंगडे यांनी शहरातील ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमण हटविण्याबाबत आयुक्तांसह जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी केलेल्या आहेत.

त्यावर महापालिकेने नाशिक येथील एका कंपनीला शहरातील ओढ्या-नाल्यांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. संबंधित कंपनीने शहरातील सुमारे 41 ओढ्या-नाल्यांचे सर्व्हेक्षण करून अहवाल आयुक्तांना सादर केला. सावेडी उपनगरामध्ये अनेक ठिकाणी ओढ्या नाल्यांवर पाईप टाकून बुजविण्यात आले आहे. तर, काही ठिकाणी ओढ्या प्रवाह बदलविण्यात आला आहे.
पाईप लाईन रस्ता खोदून भूमिगत ओढा काढून देण्यात आला आहे. तर, शहरात ओढे-नाले बुजवून आणि ओढ्यालगत 368 घरे बांधण्यात आली आहेत. तर, ओढ्यावर आणि भोवताली सुमारे 131 प्लॅट आहेत. त्या प्लॅटची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

लेआऊट 1974

सावेडी उपनगरातील ओढ्या-नाल्यांवर पाईप टाकून बंदिस्त करण्यात आले आहेत. सर्व्हेक्षण त्या ओढ्या-नाल्यांवर 1974, 1982, 1983 पासून लेआऊट टाकण्यात आले आहेत. काही ओढे गाव नकाशावर आहेत. डीपी प्लँनवर नाहीत. तर, गाव नकाशावर त्यांची दिशाच वेळी आहे. प्रत्यक्षात ओढा दुसर्‍या दिशेने जात आहे.

नाल्यांची संख्या (लांबी मीटर)
सावेडी-भिस्तबाग – 9 (28.898)
बोल्हेगाव-नागापूर – 5 (10.07)
नालेगाव मोरचूदनगर – 4 (10.85)
केडगाव – 16 (31.531)
भिंगार – 3 (2.295)
नगर गावठाण – 1 (1.2)
भिंगार नदी – 1 (3.38)
सीना नदी – 1 (11.55)

Back to top button