नगरी पेरूची परदेशींनाही भुरळ ! अमेरिका, इंग्लंड, दुबईत पोहचला ज्युस; जेऊर पट्टा पेरूचे पठार | पुढारी

नगरी पेरूची परदेशींनाही भुरळ ! अमेरिका, इंग्लंड, दुबईत पोहचला ज्युस; जेऊर पट्टा पेरूचे पठार

शशिकांत पवार :

नगर : तालुक्यातील जमीन व पोषक वातावरणामुळे पेरूची गुणवत्ता चांगली असल्याने राज्य, परराज्यातून येथील पेरूला मोठी मागणी होत आहे. तालुक्यातील पेरू मुंबई, गोवा, गुजरात याबरोबरच विविध भागात निर्यात केला जात आहे. पेरू पासून बनविण्यात येणारा ज्यूस थेट परदेशात अमेरिका, इंग्लंड, दुबई येथे जात असल्याने शेतकर्‍यांनाही पेरूतून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.  नगर तालुक्यातील जेऊर पट्टा पेरूचे पठार म्हणून उदयास येत आहे. इतर ठिकाणी तुरळक प्रमाणात पेरूच्या बागा आढळून येतात. परंतु जेऊर पट्टा पेरूच्या उत्पादनात तालुक्यात अग्रेसर आहे. मुरमाड तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन पेरू उत्पादनासाठी उत्तम असल्याने जेऊर पट्ट्यात पेरूचे उत्पादन व फळाची गुणवत्ता चांगली आढळून येत आहे. त्यामुळे येथील पेरूला राज्य तसेच पर राज्यातून मोठी मागणी होत आहे.

पेरूचा मुख्य हंगाम हा ऑक्टोबर ते जानेवारी महिना असून यावेळी फळतोड करण्यात येत असते. काही जातींचे पेरू हे पूर्ण हंगामात फळधारणा करतात. पेरू उत्पादनासाठी काळजी देखील मोठ्या प्रमाणात घ्यावी लागते. कमी दाबाचा पट्टा तयार होऊन वातावरणात आर्द्रता, ढगाळ वातावरण, दव यामुळे पेरूच्या बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. बुरशी, देवी, लाल माशी लागणे अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसत असतो.

रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकर्‍यांना वेळोवेळी औषध फवारणी, झाडांच्या वयानुसार शेणखत, रासायनिक खतांचा डोस दिला जातो. त्यामुळे शेतकर्‍यांचा खर्च वाढत असतो. परंतु वातावरण चांगले राहिल्यास उत्पादन तसेच गुणवत्ता चांगली राहत असते.
त्यामुळे तालुक्यातील पेरूला बाजारात चांगलीच मागणी असून तालुक्यातील पेरू मुंबई, पुणा, गोवा, गुजरात, औरंगाबाद याशिवाय इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात येत आहे. तर कंपनीमध्ये ज्यूस बनवून तालुक्यातील पेरूने थेट परदेशी नागरिकांना देखील भुरळ घातली आहे.

नगर तालुक्यात मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे. त्यामुळे येथील पेरूला गोडी जास्त असते. गावरान पेरूमध्ये इतर पेरुंपेक्षा गोडी अधिक असते. उत्तम दर्जा व गोडी मुळे तालुक्यातील पेरूंना दूरवरच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते.
                                            – पोपटराव नवले,  तालुका कृषी अधिकारी.

सुरुवातीला पूर्ण पानगळ करून घ्यावी. पानगळीनंतर झाडांची छाटणी करावी. बुरशीनाशक फवारणी तसेच झाडाच्या दोन्ही बाजूने खड्डा घेऊन शेणखत, जीवामृत बनवून झाडांना डोस द्यावा. यामुळे उत्पादनात वाढ तसेच फळांची गुणवत्ता चांगली राखली जाते.
                                 – संदिप नारायण तोडमल, पेरू उत्पादक शेतकरी, जेऊर

35 रुपयांपर्यंत मिळतो भाव

नगर तालुक्यात लखनौ 49, सरदार, तैवान पिंक, थाई 7, थाई 4, इलाहाबाद सफेद या जातींच्या पेरूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. लखनौ व सरदार या जातींचे वृक्ष सुमारे पन्नास वर्षांपर्यंत फळ देतात तर इतर जातींचे वृक्ष पंधरा वर्षापर्यंत फळ देतात. एकरी उत्पादन फळ लागवडीनंतर तीन वर्षापासून 14 टन ते 28 टनांपर्यंत मिळते. बाजारात ठोक भाव पंधरा रुपये ते 35 रुपयांपर्यंत प्रति किलो मिळतो.

Back to top button