नगर : अवैध मद्यविक्रीवर पोलिसांचा वॉच | पुढारी

नगर : अवैध मद्यविक्रीवर पोलिसांचा वॉच

नगर : पुढारी वृत्तसेवा :  सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागताची तयारी जिल्ह्यात सुरू आहे. या काळात अवैध, परराज्यातील, बनावट मद्य विक्री प्रकरणी करवाईसाठी आठ भरारी पथकांचा वॉच असणार आहे. अवैध मद्य विक्री, वाहतूक तसेच अवैध ठिकाणी मद्य प्राशन करणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचा निर्धार राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला आहे.  अवैध, बनावट मद्यविक्री रोखण्यासाठी कार्यकारी अधिकारी, भरारी पथके तसेच अकार्यकारी घटकावरील काही अधिकारी यांची आठ विशेष पथके जिल्हयात नियुक्त केली आहेत.

या पथकाद्वारे या कालावधीत रात्र गस्त तसेच बेकायदेशीर मद्यविक्री होऊ नये, यासाठी कारवाई करणार असून सराईत गुन्हेगारावर लक्ष ठेवण्याचे कामही या पथकामार्फत केले जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.
आपल्या परिसरात अवैध मद्याची विक्री, निर्मिती तसेच वाहतूक होत असल्यास तत्काळ त्याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

…तर हॉटेल, ढाब्यांवरही होणार कारवाई

बेकायदेशीरपणे अवैध मद्यविक्री करणारे हॉटेल, ढाबे, दारुचे गुत्ते, अवैध ताडी विक्री, निर्मिती, हातभटटी दारु विक्री, निर्मिती आदी ठिकाणावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय कार्यालये, भरारी पथके तसेच तयार करण्यात आलेल्या विशेष पथकास देण्यात आले आहेत.

 

Back to top button