जाताना ‘ती’ देऊन गेली अंध डोळ्यांना नवी दृष्टी | पुढारी

जाताना 'ती' देऊन गेली अंध डोळ्यांना नवी दृष्टी

संगमनेर : तिचा अपघात झाला …आणि त्या अपघातात तिचे निधन झाले. ही बातमीच तिच्या आई वडिलांसह नातेवाईकांना धक्का देणारी होती. पोटचा गोळा गेला आहे, अशा ही कठीण प्रसंगात सुद्धा गुंजाळ परिवाराने मनावर दगड ठेवून तिचे नेत्रदान झाले तर तिच्या डोळ्यांनी एखाद्या व्यक्तीला नक्कीच दृष्टी मिळेल, हा उदात्त हेतू डोळ्यामोर ठेवत गुंजाळ परिवाराने मयत वैष्णवीचे नेत्रदान केले.
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील रहिवासी असणार्‍या वैष्णवी साहेबराव गुंजाळ हिचे अपघाती निधन झाले. मात्र तिचे डोळे चांगले होते म्हणून तिचे चुलते डॉ. अनिल गुंजाळ यांनी तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. डोळे नसलेल्या एखाद्या व्यक्तीला दृष्टी मिळेल, अन तिची स्मृती कायमस्वरूपी जागृत राहील, असा विचार डॉ. गुंजाळ यांनी नेत्रदान करण्या बाबतचा विचार आपले चुलत बंधू प्रा. भाऊराव गुंजाळ यांच्या समोर मांडला. त्यांनी सुद्ध साथ देत लगेचच सहमती दिली.

चंदनापुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शार्दुल देशमुख आणि मयत वैष्णवीचे चुलते डॉ. अनिल गुंजाळ यांनी तात्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रमोद म्हस्के व रेडिओ लॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. पिशोरी लाल सचदेव यांच्याशी संपर्क साधून नेत्रदान करण्याबाबतची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. बधे यांनी क्षणाचाही विलंब न लावता अवघ्या एका फोनवर डॉ. राशी शर्मा, डॉ. सर्वेश व डॉ. अंकीता या तीन नेत्रतज्ञांच्या टिमला संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवून दिले. त्यांनी कौशल्यपूर्ण नेत्रदानाची प्रक्रिया करून मयत वैष्णवीचे डोळे काढून नेले आणि दृष्टीही नसलेल्या व्यक्तीला तिचे डोळे बसविणार असल्याचे त्या डॉक्टरांनी यावेळी सांगितले.

आमची मुलगी गेली आहे, पण तिच्या डोळ्यांनी एखाद्या दृष्टीहीन व्यक्तीला जर दृष्टी मिळाली तर त्या व्यक्तीतच आम्ही आमची मुलगी पाहू. आम्हाला त्या व्यक्तीला भेटण्यात नक्कीच आनंद वाटेल, असे मत मयत वैष्णवीचे वडील साहेबराव गुंजाळ यांनी दैनिक ‘पुढारी’ शी बोलताना व्यक्त केली.

Back to top button