नगर : अधिकार्‍यांवरील कारवाईचा आमदार पवारांकडून निषेध | पुढारी

नगर : अधिकार्‍यांवरील कारवाईचा आमदार पवारांकडून निषेध

कर्जत/जामखेड : पुढारी वृत्तसेवा : सत्ताधारी आमदारांच्या दबावात राज्य सरकारमार्फत कर्जतचेे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे नुकतेच निलंबन करण्यात आले, तर जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते आणि कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांची नुकतीच बदली केली. त्याचा आमदार रोहित पवार यांनी निषेध केला आहे. दरम्यान, कर्जत व जामखेड तालुक्यांत मिशन वात्सल्य मोहीम, विशेष साह्य योजना लाभार्थी शोध मोहीम, पालकमंत्री शेत पाणंद रस्ते अशा विविध कामांमध्ये महत्वाची भूमिका बजावत या अधिकार्‍यांनी लाभार्थ्यांचा एक नवा विक्रम प्रस्थापित करत उल्लेखनीय कामगिरी बजावली. तसेच कर्जत व जामखेड या तालुक्यांत 33 हजारांहून अधिक इष्टांक संपवला आणि पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका मिळवून दिल्या. तसेच यंदा एकाच वेळी 20 हजारांच्या आसपास नागरिकांना शिधापत्रिका वाटप करण्याचा उपक्रम अधिकार्‍यांच्या मदतीने राबवण्यात आला होता.

याशिवाय विशेष साह्य योजना लाभार्थी शोध मोहीम राबवून अवघ्या एक महिन्यात 5 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध निवृत्ती वेतन योजना मंजूर केली. सोबतच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना या योजनांच्या हजारो लाभार्थ्यांना लाभ मिळाला व पालकमंत्री शेत पानंद रस्ते योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे देखील पूर्ण झाली आहेत. याशिवाय कोरोनात या अधिकार्‍यांनी सामाजिक भान ठेवून केलेली कामे केले.

विधानपरिषदेत मतदारसंघातील नागरिकांच्या हिताचा एकही प्रश्न आ. राम शिंदे यांनी मांडला नाही. त्यांनी फक्त राजकीय द्वेषातून अधिकार्‍यांवर कारवाई करा आणि कामे थांबविण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही. अन्यायकारक कारवाई केलेल्या चांगल्या अधिकार्‍यां बरोबर कर्जत जामखेडमधील जनता, पदाधिकारी आम्ही सर्वजण आहोत.
                                                                               -आमदार रोहित पवार

Back to top button