नगर : सीना नदी पात्रातून वाळू तस्करी | पुढारी

नगर : सीना नदी पात्रातून वाळू तस्करी

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातून वाहणार्‍या सीना नदीच्या पात्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून, या वाळू तस्करांवर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापेमारी सुरू केली आहे. तालुक्यातील हातवळणच्या शिवारात केलेल्या कारवाईत दोन वाळूतस्करांना पकडण्यात आले असून, एक पसार झाला आहे. पकडलेल्या दोघांकडून वाळूसह दोन वाहने, असा एकूण 9 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशान्वये फरार आरोपीचा शोध घेत असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबर्‍यामार्फत हातळवण शिवारात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिस निरीक्षक कटके, पोलिस कर्मचारी कमलेश पाथरुट, दिनेश मोरे, लक्ष्मण खोकले, शंकर चौधरी, संदीप दरंदले, रवींद्र घुगांसे, रविकिरण सोनटक्के, विजय धनेश्वर, सागर ससाणे, जालिंदर माने, शिवाजी ढाकणे यांच्या पथकाने हातळवण गावच्या शिवारात स्मशान भूमीजवळ सीना नदीपात्रात छापा टाकला.

पोलिसांची चाहूल लागताच तीन ते चार मजूर पळून गेले. तेथे उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरवरील चालक अरबाज मोबीन काझी (वय 30,रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा) व अक्षय सुभाष जाधव (वय 28, रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा) यांना ताब्यात घेऊन पथकाने चौकशी केली.
त्यांनी मालकाचे नाव महेश ऊर्फ पप्पू हणुमंत कोथींबरे (रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा) असल्याचे सांगितले. या दोघांसह दोन ट्रॅक्टर व त्यातील वाळू ताब्यात घेण्यात आली. या दोघांसह मालकाविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button