बारामती अ‍ॅग्रोवर कारवाई होणार; लेखा परीक्षक निलंबित | पुढारी

बारामती अ‍ॅग्रोवर कारवाई होणार; लेखा परीक्षक निलंबित

जामखेड : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा बारामती अ‍ॅग्रो साखर कारखाना गळीत हंगामापूर्वी सुरू झाल्याचे प्रकरण आमदार राम शिंदे यांनी लावून धरले होते. अखेर या प्रकरणाची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. विशेष लेखापरीक्षक अजय देशमुख यांना निलंबित करण्याचा आदेश सरकारकडून काढण्यात आले आहेत. या आदेशामुळे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

आमदार पवार यांचा इंदापूर तालुक्यातील शेटफळे येथे बारामती अ‍ॅग्रो हा साखर कारखाना आहे. सदर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामापूर्वी साखर कारखाना सुरू केला होता. याबाबत आमदार राम शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे 19 ऑक्टोबर रोजी तक्रार केली होती. साखर आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती. परंतु, चौकशी समितीने क्लिनचिट दिली होती. त्यानंतर आमदार शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणात सरकारकडून सखोल चौकशी करण्यात आली. यानंतर सरकारने मोठी कारवाई केली. सदर प्रकरणातील प्रथम चौकशी अधिकारी विशेष लेखापरिक्षक अजय देशमुख यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.

Back to top button