नगर : बिबट्याचा मृत्यू फासात अडकून? जेऊर येथील प्रकरणात नव्याने ‘ट्विस्ट’ | पुढारी

नगर : बिबट्याचा मृत्यू फासात अडकून? जेऊर येथील प्रकरणात नव्याने ‘ट्विस्ट’

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर येथे शुक्रवारी (दि.23) झालेल्या बिबट्याच्या मृत्यू प्रकरणात नव्याने ‘ट्विस्ट’ येणार आहे. बिबट्याचा मृत्यू हा तारेच्या कुंपणांमध्ये अडकून झाला नसून, तेथे रानडुकरांसाठी लावलेल्या फासामध्ये अडकून झाल्याची चर्चा, तसेच प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर शिवारातील गट नंबर 181 मधील पेरूच्या बागेला लावलेल्या तारेच्या कुंपणाला अडकून बिबट्याचा मृत्यू झाला होता. परंतु, सदर मृत्यू हा तारेच्या कुंपणाला अडकून झाला नसून, तेथे रानडुकराच्या शिकारीसाठी फास लावण्यात आला होता. अन् त्या फासात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. याबाबत गावात तसेच प्रत्यक्षदर्शींकडून माहिती देण्यात येत असून सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

बिबट्या हा वर्ग 1 क्रमांकातील प्राणी असून, त्याचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे निश्चितच दुर्दैवी आहे. वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अन् त्यातच वर्ग एक मधील प्राण्याचा असा दुर्दैवी मृत्यू होणे हे चिंताजनक आहे. यापूर्वी रस्ते अपघातात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. परंतु रानडुकराच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासामध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू होण्याची जेऊर मंडळातील ही पहिलीच घटना आहे. बिबट्या हा रानडुकरासाठी लावलेल्या फासात अडकून मृत्यू झाल्याची चांगलीच चर्चा गावात सुरू झाली आहे.

वन्य प्राण्यांचे जतन व संवर्धन होण्यासाठी वन विभागाच्या वतीने नेहमीच प्रयत्न केले जातात. परंतु अशा प्रकारे वन्य प्राण्यांचे मृत्यू होत असतील तर ते निसर्गचक्रासाठी घातकच आहे. बिबट्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे यांनी केले असून त्यांच्या अहवाला नंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. सदर बिबट्याचा मृत्यू प्रकरणाची वन विभागाने सखोल चौकशी करावी. रानडुकरांना मारण्याची देखील परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे फास का लावण्यात आला? कोणाच्या सांगण्यावरून लावण्यात आला?

तसेच यापूर्वी याच पद्धतीने इतर वन्य प्राण्यांच्या शिकार झालेल्या आहेत का? याबाबत वन विभागाच्या वतीने चौकशी करणे गरजेचे आहे. घटनास्थळी उपवन संरक्षण सुवर्णा माने, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मनेष जाधव, वनरक्षक श्रीराम जगताप यांनी भेटी देऊन सदर क्षेत्रावरील सर्व बाबींची बारकाईने तपासणी केली आहे. वन विभागाच्या वतीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

वन्य प्राण्याची शिकार गुन्हा : माने

कोणत्याही वन्य प्राण्यांची शिकार करणे हा गुन्हाच आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या जीविताला धोका पोहोचणार नाही, यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. बिबट्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू असून लवकरच दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे येथील उपवन संरक्षक सुवर्णा माने यांनी सांगितले.

वाघुर तसेच फास लावण्यास बंदी

वन विभागाचे क्षेत्र अथवा वैयक्तिक क्षेत्रात वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी फास तसेच वाघुर लावण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे अशा प्रकारे वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी फास, वाघुर लावल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button