कर्जतला हॉटेलवर टोळक्याचा हल्ला ; सहा आरोपींना अटक | पुढारी

कर्जतला हॉटेलवर टोळक्याचा हल्ला ; सहा आरोपींना अटक

कर्जत :  पुढारी वृत्तसेवा : कर्जत शहरातील कुळधरण रस्त्यावर गुंडवस्ती येथे असलेल्या तान्हाजी हॉटेलवर शनिवारी रात्री काही जणांनी जेवणाचे बिल देण्यास नकार देत हॉटेलमधील सामानाची मोडतोड करून हॉटेल चालक पंडित निंबाळकर व महेंद्र बागल आणि कामगारांना लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचे तीव्र पडसाद रविवारी उमटले. सकल मराठा समाजाचे समन्वयक वैभव लाळगे यांनी या घटनेचा निषेध करत कर्जत शहर बंदची हाक दिली. काल सर्व दुकाने पूर्णपणे बंद होती. तसेच पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे.

दि.24 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास हॉटेल तानाजी येथे प्रकाश चंद्रकांत कांबळे (रा. सिद्धार्थनगर, कर्जत) व त्यासोबत अन्य दोघे जेवण करण्यासाठी आले होते. त्यांनी जेवणानंतर हॉटेल मालकास शिवीगाळ व दमदाटी करून बिल देण्यास नकार दिला. बिल द्यावेच लागेल’ असे म्हणल्यावर आरोपी प्रकाश कांबळे याने इतर आरोपींना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर प्रकाश कांबळे, सोहम किसन कदम, करण बाळासाहेब थोरात, सागर उर्फ आनंद गौतम समुद्र, रोहन किसन कदम, मनोज विजय माने सर्व रा. कर्जत व इतर 25 ते 30 लोकांनी ओमीनी व्हॅन व मोटरसायकलवर येऊन काठ्या-गज असे साहित्य घेऊन हॉटेलमध्ये येऊन हॉटेल चालक मालकास काठीने व गजाने मारहाण करून व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी हॉटेल व्यावसायिक यांचे सहकारी महेंद्र लालासाहेब बागल, कामगार फारूक शेख हे मध्ये आले असता त्यांनाही सात ते आठ लोकांनी मारहाण केली. हॉटेलमधील फ्रीज, काउंटर, किचन सामान, टीव्ही, टेबल, खुर्च्या, बेसिन, हॉटेलमधील ग्राहकांना बसण्यासाठी असलेल्या पार्टीशन रुमचे नुकसान केले.  कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही तसेच फिर्यादी व साक्षीदार यांना विचारपुस करून आरोपी निष्पन्न करून मुख्य आरोपीसह प्रकाश चंद्रकांत कांबळे, सोहन किसन कदम, करण बाळासाहेब थोरात, सागर उर्फ आनंद गौतम समुद्र, रोहन किसन कदम, मनोज विजय माने सर्व (रा. कर्जत) या सहा आरोपींना जेरबंद केले आहे. इतर आरोपींची नावे निष्पन्न करून कायदेशीर कारवाई सुरू आहे.

पत्रकारांना माहिती देताना सकल मराठा समाजाचे समन्वयक वैभव लाळगे यांनी सांगितले की, ही घटना अतिशय निंदनीय आहे. अशा पद्धतीने हॉटेलमध्ये जेवणासाठी जाऊन बिल न देता त्यांनाच मारहाण करून हॉटेलचे नुकसान करणे, हे योग्य घडले नाही. आम्ही सर्व सकल मराठा समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो. या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी आमची मागणी असून, अशा घटना यापुढे घडल्यास त्या सहन केल्या जाणार नाही, असा इशारा लाळगे यांनी दिला. यावेळी सकल मराठा समाजाची शेकडो युवक उपस्थित होते. तत्पूर्वी काल रविवारी असंख्य युवक रॅली काढून कर्जत पोलिस स्टेशन येथे गेले व या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली.

Back to top button