नगर : पुढारी वृत्तसेवा : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह 10 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहे. तब्बल 24 महिने 22 दिवसांनंतर दोषारोप निश्चित करण्यात आले. दोन आरोपींवर अद्यापि आरोप निश्चिती होणे बाकी असून, त्यापैकी एक महिला आरोपी फरार आहे. तर एकाने शुक्रवारी (दि.23) झालेल्या सुनावणीला गैरहजेरी लावली.
30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी रेखा जरे यांच्या आई सिंधूबाई वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ गुड्ड्या शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) या 5 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला सुमारे साडेतीन महिन्यांनी हैदराबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. बोठेला फरार होण्यास मदत करणार्या जनार्दन अकुला चंद्राप्पा, राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ यांना अटक केली होती. पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी या महिलेचाही आरोपीत समावेश होता. मात्र ती अद्यापि फरार आहे. त्याचवेळी नगरमधून महेश तनपुरे यालाही बोठेला मदत केल्याबद्दल पोलिसांनी अटक केली होती.
या सर्व 12 आरोपींविरूद्ध आरोप निश्चितीची प्रक्रिया प्रलंबित होती. शुक्रवारी (दि.23) जिल्हा न्यायाधीश अॅड. सुनील गोसावी यांच्या न्यायालयासमोर 10 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले. या खटल्याचे कामकाज राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव हे पाहत असून त्यांना सहायक म्हणून अॅड. सचिन पटेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.
पुढील सुनावणी 4 जानेवारीला
जरे खून खटल्याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या 4 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. या सुनावणीत आरोपी जनार्दन अकुला चंद्राप्पा याच्यासह फरार पी. अनंतलक्ष्मी यांच्यावरील आरोप निश्चिती प्रक्रिया होणार असल्याचे समजते. चंद्राप्पा पुढील सुनावणीला गैरहजर राहिल्यास पकड वॉरंट जारी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यांच्यावर आरोप निश्चित
मुख्य आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे, ज्ञानेश्वर उर्फ गुड्ड्या शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर चोळके, फिरोज राजू शेख, ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे, राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ, महेश वसंतराव तनपुरे अशा 10 आरोपींवर आरोप निश्चित झाले. तर जनार्दन अकुला चंद्राप्पा (गैरहजर) याच्यासह पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (फरार) या दोन आरोपीवर आरोप निश्चित होणे बाकी आहे.