शिर्डी : साईचरणी 50 हजार डॉलरचे दान | पुढारी

शिर्डी : साईचरणी 50 हजार डॉलरचे दान

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : साईबाबांच्या महतीचा महिमा अगाध… याचा प्रत्यय वारंवार साईभक्त येत असतो. मूळ भारतीय निवासी असलेल्या अमेरिकन साई भक्ताने दुर्बल घटकांच्या उपचारासाठी 50 हजार अमेरिकन डॉलर साईचरणी अर्पण केल्याची माहिती अखिल शर्मा यांनी माध्यमांना दिली.  अखिल शर्मा हे पत्नी अपर्णा, मुलांसह शुक्रवारी (दि.23) शिर्डीत साई दर्शनासाठी आले होते. साईबाबांनी इच्छापूर्ती केल्याने हे दान केले असल्याचे शर्मा यांनी सांगितले. साईबाबा संस्थानच्यावतीने प्रशासकीय अधिकारी तथा मुख्य लेखा शाखाधिकारी कैलास खराडे यांनी शाल देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.

माध्यमांशी संवाद साधताना शर्मा म्हणाले, साईबाबांशी आमची नाळ खूप जुनी आहे. अपर्णा र्शा म्हणाल्या, सतरा वर्षाची असताना माझे वडील हे पंजाब लष्करात होते. मेडिकल विद्यार्थी म्हणून गोव्याला जात असताना साईबाबा दर्शनाचा योग आला होता. तेव्हापासून साईबाबांशी अतूट नाते निर्माण झाले. गत दोन वर्षांपासून साईदर्शनाला यायचे होते. मात्र कोरोनामुळे येणे झाले नाही. मोठा मुलगा मेडिकल क्षेत्रात दाखल झाला आहे. म्हणून साई दर्शनाला आलो आहोत.

50 हजार अमेरिकन डॉलरचे दान केले आहे. त्याचे भारतीय बाजारमुल्य 41 लाखाच्या आसपास आहे. शिर्डी येथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांसाठी हे दान वापरले जावे, अशी इच्छा शर्मा यांनी व्यक्त केली. साईबाबांच्या भक्तीचा महिमा देशातच नव्हे तर साता समुद्रापल्याड पोहचल्याची प्रचिती या दानातून आली. विदेशी भाविक नेहमीच शिर्डीच्या साईचरणी लीन होतात. मूळ पंजाब निवासी शर्मा हे अमेरिकेतील कॅलीफोर्निया निवासी आहेत. त्यांनी हे दान साईबाबा चरणी अर्पण केले.

Back to top button