

कर्जत (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : कर्जत शहरातील सर्वात जुनी बाजारपेठ असलेल्या परिसरातील सर्व व्यापारी बांधवांनी एकत्र येऊन या परिसरास छत्रपती शिवाजी महाराज मार्केट असे नामकरण केले. यावेळी व्यापारी संघटनेची नूतन कार्यकारीणीही जाहीर केली.
एवढेच नव्हे तर या परिसरामध्ये आगामी काळामध्ये पर्यावरणासह स्वच्छता व इतर अनेक अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिसरातील व्यापारी बांधवांनी एकत्र येत नवीन कार्यकारणी देखील जाहीर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट अध्यक्ष नितीन देशमुख, उपाध्यक्ष सचिन शेठ कुलथे, सचिव संजय काकडे, खजिनदार सचिन डीसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी श्याम पवार, यश बोरा, महेश परहर, अनिल राऊत, बाळासाहेब कवडे ,शरद शेलार, सुरेश तोरडमल, राजू शहा, जाहीद सय्यद, मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. या नवीन कार्यकारणीचे डॉ. मधुकर काळदाते, डॉ. रमेश जेवरे, उमेश जेवरे, प्रवीण ढोकरीकर, नंदलाल काळदाते, सकिंदर झगडे, किशोर कुलथे आदींनी अभिनंदन केले आहे. अध्यक्ष नितीन देशमुख म्हणाले की, शहरातील सर्वात जुनी बाजारपेठ म्हणून या परिसराची ओळख आहे आणि ही बाजारपेठ महत्त्वाची देखील आहे. या परिसरामध्ये वाहतुकीच्या कोंडीची मोठी समस्या होती. मात्र सर्व व्यापारी व पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पुढाकारामधून वाहतुकीची व वाहनांची समस्या दूर केली आहे.
आगामी काळामध्ये सर्व दुकानांच्या पाट्या एक सारख्या करणे, दुकानाच्या दारामध्ये झाडांच्या कुंड्या बसवणे, परिसरातील स्वच्छता, यासह अनेक उपक्रम सर्व व्यापार्यांना एकत्र करून घेण्यात येतील व पर्यावरणाचा संदेश देण्यात येणारा असून, याचे अनुकरण सर्वत्र व्हावे हा आमचा उद्देश आहे, असे देशमुख यांनी सांगितले. उपाध्यक्ष सचिन कुलथे यांनी आभार मानले.