नगर : कबड्डीच्या ‘किताब’साठी भिडणार ‘नगर’ | पुढारी

नगर : कबड्डीच्या ‘किताब’साठी भिडणार ‘नगर’

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगरच्या वाडिया पार्क मैदानावर मॅटवर प्रथमच होत असलेल्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत नगरचा पुरुष संघ कोल्हापूर, हिंगोली व सोलापूरशी, तर महिला संघ कोल्हापूर, नांदेडच्या संघाबरोबर दोन हात करणार आहे. बाद फेरीत पोहचण्यासाठी नगरच्या दोन्ही संघांना गटात चांगलीच चुरस लागणार आहे. आव्हान सोपे असले, तरी ही स्पर्धा मॅटवर होत आहे. यामुळे नगरसह सर्वच खेळाडूंचा कस लागणार आहे. राज्य कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत राज्यातील 35 प्रो-कबड्डीपटू सहभागी होणार असून, नगरमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कबड्डी स्पर्धा होत आहे. नगरकरांसाठी ही मोठी मेजवाजी आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रशासकीय अधिकारी सचिन भोसले यांनी पत्रकारांना दिली.

प्रो-कबड्डीप्रमाणे या स्पर्धेचे कॉर्पोरेट स्टाईलने आयोजन केले असून, प्रथमच मॅटवर ही स्पर्धा होत आहे. या मैदानाची पाहणी करण्यासाठी राज्य कबड्डी संघटनेचे प्रशासकीय अधिकारी सचिन भोसले व अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव नगरला आले होते. त्यांच्यासमवेत जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे सचिव प्रा. शशिकांत गाडे, सहसचिव विजय मिस्कीन, जयंत वाघ, कैलास पठारे, शंतनू पांडव, प्रकाश बोरूडे, नगरसेवक बाळासाहेब बोर्‍हाटे, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

भोसले म्हणाले, 70 वर्षात प्रथमच कबड्डी स्पर्धा मॅटवर होत असून, त्याचा मान नगरच्या जिल्हा हौशी कबड्डी संघटने पटकाविला आहे. यात राज्यातील 25 जिल्ह्यातील पुरुष व महिला संघ सहभागी होणार असून, 700 खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नगरकरांना मिळणार आहे. राज्यातील पहिली मॅटवरील कबड्डी स्पर्धा नगरमध्ये होत असून, एकाच वेळी 10 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतील अशी प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम चालू आहे. राज्यातील खेळाडूंना प्रथमच मॅटवर खेळण्याची संधी मिळणार आहे, असे शांताराम जाधव यांनी सांगीतले. नगरमध्ये आयोजित या स्पर्धेत आतापर्यंत पुरुष गटाचे सर्व संलग्न जिल्हे सहभागी होत असत, परंतु यंदा महिलांचेही सर्व संघ सहभागी झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून हा संघ पुरुष गटात खेळत होता; परंतु महिला गटात यंदा प्रथमच सहभागी होणार आहे. या सर्व सहभागी संघाची 6-6 गटात विभागणी करण्यात आली आहे. पुरुषांच्या ‘ब’ गटात मुंबई शहर, सांगली, रायगड यांच्यात बाद फेरी गाठण्यासाठी चुरस लागणार आहे. महिलांच्या ‘अ’ व ‘ब’ गटातही हीच स्थिती आहे. महिलांच्या ‘अ’ गटात पुणे, ठाणे यांना परभणी कडवी लढत देऊ शकते, ‘ब’ गटात मुंबई शहर, धुळे, सातारा या संघात कोण बाद फेरीत जाणार हे त्याचवेळी समजेल.

स्पर्धेची पुरुष गटविभागणी

‘अ’गट : अहमदनगर, कोल्हापूर, हिंगोली, सोलापूर. ‘ब’ गट : मुंबई शहर, सांगली, रायगड, जळगाव. ‘क’ गट : धुळे, नांदेड, बीड, पालघर. ‘ड’ गट : मुंबई उपनगर, पुणे, परभणी, जालना. ‘इ’गट : नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, सातारा. ‘फ’ गट : ठाणे, नंदुरबार, सिंधुदुर्ग, लातूर, उस्मानाबाद.

महिला गट विभागणी

‘अ’ गट : पुणे, ठाणे, परभणी, हिंगोली. ‘ब’ गट : मुंबई शहर, धुळे, सातारा, जालना. ‘क’ गट : मुंबई उपनगर, औरंगाबाद, नाशिक, लातूर. ‘ड’ गट : पालघर, रत्नागिरी, सोलापूर, उस्मानाबाद. ‘इ’गट : कोल्हापूर, नांदेड, अहमदनगर, बीड. ‘फ’गट : रायगड, सांगली, जळगाव, सिंधुदुर्ग, नंदुरबार.

Back to top button