अधीक्षकांकडून कर्जत पोलिसांचा सन्मान | पुढारी

अधीक्षकांकडून कर्जत पोलिसांचा सन्मान

राशीन : पुढारी वृत्तसेवा : येथील जगदंबा (यमाई) देवी, तसेच कुळधरण नवरात्रोत्सवाच्या कालावधीत उत्कृष्ट नियोजन करून चोर्‍या करतानाच दहा चोरटे पकडल्याबद्दल कर्जत पोलिसांचा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सन्मान केला. यावेळी कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे स्वाती भोर उपस्थित होते. राशीन येथील यमाई देवीचे सुलभपणे दर्शन घडवणारी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची संकल्पना भाविकांना भावली. नियोजित बॅरिकेट्स, सुलभ दर्शनरांग, तसेच या रांगेवर लक्ष ठेवून असलेली सीसीटीव्ही यंत्रणा, नियोजित वाहन पार्किंग, एका रांगेत लावलेली व्यावसायिक दुकाने आदींमुळे महिलांना सुलभपणे दर्शन घेता आले.

जगदंबा देवी ट्रस्ट, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांना विश्वासात घेऊन सलग दोन वर्षांंपासून यादव यांनी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन घडले. नवरात्रोत्सवात अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आपल्या व्यावसायाकरिता अतिक्रमणे करतात. मात्र, पोलिस यंत्रणेने शिस्तीचे दर्शन घडवून अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवले. संपूर्ण रस्ता मोकळा असल्याने ये- जा करणार्‍या भाविकांना सुरक्षित वाटू लागले. ज्येष्ठ भाविकदेखील रांगेतून दर्शन घेत.विशेष म्हणजे गर्दी असतानाही कमी वेळेत दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली. पालखीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले. पालखी जवळ पूर्ण वेळ पोलीस बंदोबस्त ठेवून विनाकारण त्रास देणार्‍या हुल्लडबाजांवर नियंत्रण मिळवले.त्याबद्दल राशीन गावकर्‍यांनी कर्जत पोलिसांचा ठिकठिकाणी सत्कार केला.

पोेलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित, पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे, भगवान शिरसाठ, अनंत सालगुडे, पोलिस भाऊ काळे, अर्जुन पोकळे, संपत शिंदे, सचिन वारे, श्याम जाधव, पांडुरंग भांडवलकर, संभाजी वाबळे, गोवर्धन कदम, महादेव कोहक, मनोज लातूरकर यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Back to top button