नेवासा : ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यांचा श्वास कोंडला | पुढारी

नेवासा : ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यांचा श्वास कोंडला

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : शहरातील नगरपंचायत हद्दीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानकडे येणार्‍या रस्त्यांवरील अतिक्रमणे आठ दिवसांत काढण्यात यावीत. अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा येथील ज्ञानेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आला आहे.
यासंदर्भात नेवासा नगरपंचायतीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व मराठीचे विद्यापीठ म्हणून नेवाशाचे ज्ञानेश्वरीचे रचनास्थान संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर ओळखले जाते. या मंदिर संस्थानकडे येणार्‍या नेवासा शहर हद्दीतील सर्व मुख्य रस्त्यावर फेरीवाले, फळ व भाजीविक्रेते, रस्त्यालगतचे दुकानदार यांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे.

रहदारीसाठी असलेल्या रस्त्याची निम्म्याहून अधिक जागा त्यांनी व्यापली जात आहे. अतिक्रमणामुळे रस्त्यावर झालेल्या अडचणीने भाविकांच्या व यात्रेकरुंच्या गाड्या मंदिराकडे येण्यास अडचण होत आहे. रविवार आठवडे बाजारच्या दिवशी मंदिराकडे येण्यासाठी अजिबातही रस्ता मोकळा नसतो. वास्तविक रविवारच्या दिवशी येणार्‍या पर्यटकांची व यात्रेकरुंची संख्या मोठ्या प्रमाणात असते. परंतु बर्‍याच यात्रा कंपन्या आपल्या यात्रा कार्यक्रमातून नेवासा भेट वगळत आहेत. मंदिराकडे जाण्यासाठी मोकळे रस्ते नसणे, हे त्यामगील कारण आहे. ही गोष्ट नेवासा व मंदिराच्या विकासासाठी निश्चितच मारक आहे.

एकीकडे तीर्थक्षेत्र विकासासाठी शासन स्तरावर व लोकवर्गणीतून व्यापक प्रयत्न होत असताना, दुसरीकडे काही व्यावसायिकांच्या अट्टहासामुळे तीर्थक्षेत्राकडे भाविक पाठ फिरवित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर अतिक्रमणे काढून मंदिराकडे येणारे हमरस्ते त्वरित रहदारीसाठी मोकळे करावेत. या सर्व रस्त्यावरील व्यापार्‍यांचे योग्य ते पुनर्वसन करावे. रविवार आठवडे बाजारच्या दिवशी हे फेरीवाले व दुकानदार रस्त्यावर येणार नाहीत, अशी तजवीज करावी.  पुन्हा या रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, मंदिराकडे जाणारे दळणवळणाचे मुख्यरस्ते हे नियमितपणे मोकळे राहतील, याबाबत आठ दिवसांत ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आला आहे.

Back to top button