संगमनेर : विहिरीवरील रस्त्यावरून दोन गटात हाणामार्‍या | पुढारी

संगमनेर : विहिरीवरील रस्त्यावरून दोन गटात हाणामार्‍या

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : सामायिक विहिरीवरून शेतात पाणी भरण्यास जाण्याच्या रस्त्याच्या वादावरून दोन गटात तुंबळ हाणामार्‍या झाल्या. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात दोन्ही गटातील 8 जणांवर विनयभंग व हाणामार्‍या या कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कोंची शिवारातील पिंपळवाडी परिसरात घडली. याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली पहिल्या घटनेची अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कोंची अंतर्गत येत असणार्‍या पिंपळवाडी परिसरामध्ये एकमेकांचे चुलत भाऊ असलेले दोन कुटुंब राहत आहे.

एकाच सामायीक विहीरीतून दोघेही पाणी उपसून शेती करत आहे. बुधवारी सकाळी विहिरीवरील विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गव्हाचे उभे पीक तुडवित का जातोस? बांधावरुन जा, असे चुलत पुतण्यास सांगितल्याचा राग अनावर झाल्यामुळे दोन भावांची एकमेकांत जुंपली. पुतण्याने आपल्या चुलत्यास आणि चुलतीस लाथाबुक्क्यांसह काठीने मारहाण केली. तसेच चुलतीचा विनयभंग केला.
या बाबत या महिलेने तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी बाप-लेकासह घारगावला राहणारा अमोल पंढरीनाथ गाडेकर आणि मुंबईतील वाशी येथील अमित रावसाहेब साळुंखे, आशाबाई रावसाहेब साळुंखे व संगीता भानुदास लोखंडे या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसर्‍या घटनेत चुलत पुतण्याची पत्नी घरात स्वयंपाक करीत असताना त्यांचा चुलत सासरा त्यांच्या घरासमोर आला. घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने घरात प्रवेश करून त्या महिलेशी लगट करू लागला. त्यावेळी त्या महिलेने त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या गदारोळात पीडितेचे सासरे तेथे आले असता त्याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Back to top button