नगर: पाथर्डीला नवीन पोलिस ठाणे कधी? वर्षात 1200 गुन्हे; पोलिस कर्मचारी संख्या अत्यल्प, गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान | पुढारी

नगर: पाथर्डीला नवीन पोलिस ठाणे कधी? वर्षात 1200 गुन्हे; पोलिस कर्मचारी संख्या अत्यल्प, गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान

पाथर्डीः महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जिल्ह्यातील जामखेड व कर्जत तालुक्यात खर्डा व मिरजगाव याठिकाणी नव्याने पोलिस स्टेशन आमदार रोहित पवारांनी मंजूर करून कार्यान्वित केले. पाथर्डी तालुक्याची अनेक दिवसांपासूनची नवीन दोन पोलिस स्टेशन व्हावे, अशी मागणी आहे, मात्र ती कधी पूर्ण होणार आणि गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार, असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना आजही पडलेला आहे.

सन 2011 च्या जनगणनेनुसार पाथर्डी तालुक्यातील 137 गावांची लोकसंख्या दोन लाख तीस हजार आहे. गेल्या 11 वर्षात झपाट्याने लोकसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाला तुटपुंजा मनुष्यबळावर काम करावे लागत आहे. परिणामी, तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढत आहे. वाढत्या गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तालुक्याला नव्याने एका पोलिस स्टेशन होणे अत्यंत गरजेचे आहे.तालुक्याचे क्षेत्रफळ हे 17 हजार 784.35 हेक्टरमध्ये पसरलेले आहे. तालुक्यातील एकमेव पोलिस स्टेशनमध्ये सहा अधिकारी आणि 71 पोलिस कर्मचार्‍यांच्या संख्येवर संपूर्ण तालुक्याचा कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचा भार आहे. म्हणजेच सरासरी तालुक्यातील दोन गावामागे एक पोलिस कर्मचारी असेच सूत्र आहे.या पोलिस कर्मचार्‍यांपैकी दहा कर्मचारी व एक अधिकारी पाथर्डी शहर हद्दीसह सात गावांचा कारभार पाहतात.

ठाणे अमंलदार,आरोपी गार्ड, बिनतारी संदेश,वाहन चालक, पोलिस स्टेशनमधील गुन्ह्याचे दप्तरी कामकाज, टपाल, गोपनीय शाखा, कंपनी चालक, समन्स व वॉरंट बजावणी अशा पोलिस स्टेशनच्या दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी दररोज 30 पोलिसांना पूर्ण दिवस गुंतून राहावे लागते. हे कर्तव्य बजावत असताना पोलिस कर्मचार्‍यांना या कामाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम कायद्याने करता येत नाही. उर्वरित कर्मचार्‍यांपैकी साप्ताहिक सुट्टीवर असणारे सुमारे आठ ते दहा कर्मचारी गेल्यावर वीस ते एकवीस पोलिस कर्मचारी शिल्लक राहतात. यातील रात्रपाळीची गस्त, दुसर्‍या पोलिस स्टेशनचा बंदोबस्त, न्यायालयात साक्षीकारीता, मुद्देमाल तपासणी कामी परगावी जाणे तर काही पोलिस कर्मचार्‍यांची प्रशिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नियुक्ती केली जाते. कोणाला आरोग्याच्या समस्या असल्यास अशा अनेक कारणास्तव सहा ते सात पोलिस कर्मचारी कमी केले, तर उरलेल्या बारा ते पंधरा कर्मचार्‍यांत तालुक्यात अचानकपणे उध्दभवणारी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कशी हाताळायची, असाच प्रश्न आहे.

अपुर्‍या पोलिस संख्येमुळे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण येऊन पोलिसांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. शारीरिक आरोग्याच्या व्याधी यामुळे पोलिसांमध्ये दिवसें दिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पोलिसांचे आरोग्य बिघडत असेल तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थती कशी सुधारेल, असाच काहीसा प्रश्न आहे.

पाथर्डी तालुक्याचा 50 टक्क्याहून अधिकची हद्द बीड जिल्हयाला लागून असल्याने बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार तालुक्यात गुन्हा करून पसार होतात. त्यामुळे नव्याने एक पोलिस स्टेशन पूर्व भागातील खरवंडी परिसरात होणे गरजेचे आहे. तालुक्यातील मिरी जवळील रुपेवाडी ते चिंचपूर पांगुळ शिवारात जोगेवाडीच्या डोंगर माथ्या पर्यंत तालुक्याची हद्द रस्त्याव्दारे लांबी पाहिली तर सुमारे 70 कि.मी. आहे. रात्रीच्यावेळी एखादी घटना मिरी परिसरात घडली आणि पोलिसांचे वाहन जोगेवाडीकडे गस्तीला असल्यास घटनेच्या ठिकाणी पोलिसांना जाण्यासाठी सुमारे दीड तासाचा वेळ हवाय. त्यात रस्त्यांची दयनीय अवस्था आहे, म्हणजे पोलिस घटना घडून गेल्यांनतर जाणार. पाथर्डी पोलिस स्टेशनला दोन वाहन आहे. त्यापैकी एक वाहनाची मुदत संपली असतांना ती नाविलाजाने वापरावे लागत आहे. ते वाहन कधी कधी तर रस्तावर बंद पडत आहे.तालुक्यात चालू वर्षभरात सर्वाधिक 1200 गुन्ह्याची नोंद पाथर्डी पोलीस ठाण्यात झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचा आकडा पाहता स्टेशनचा गुन्ह्याचा आकडा सर्वाधिक मानला जातो. त्यामुळे वाढती गुन्हेगारीसाठी आता नवीन पोलीस स्टेशन करायलाच हवे.

नवीन पोलिस स्टेशन पाथर्डी पूर्व आणि पश्चिम, अशी विभागणी करून हा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे काही महिन्यांपूर्वीच सादर करण्यात आला आहे.
-सुहास चव्हाण,पोलिस निरीक्षक, पाथर्डी

आघाडी सरकारच्या काळात वेळोवेळी आपण गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडे खरवंडी, तीसगाव तसेच शेवगाव तालुक्यातील बोधेगाव या तीन मोठ्या गावांमध्ये पोलिस स्टेशन व्हावे,यासाठी मागणी केली होती. मात्र हा प्रश्न मार्गी लागला नव्हता. आता नव्या सरकारमधील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नव्याने मागणी केली असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.
-आमदार मोनीका राजळे, शेवगाव, पाथर्डी विधानसभा

Back to top button