कर्जत : मतदारसंघात राम शिंदेंचा बोलबाला; सात ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा | पुढारी

कर्जत : मतदारसंघात राम शिंदेंचा बोलबाला; सात ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : मतदारसंघातील 11 ग्रामपंचायतींचे मंगळवारी निकाल लागले. या निकालात 11पैकी सात ग्रामपंचायतींवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. आमदार रोहित पवार यांना जोर का झटका दिला. आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा जनतेने विश्वास दाखविला आहे. अगामी बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल फायदेशीर ठरला आहे, असे सचिन पोटरे म्हणाले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील 11 ग्रामपंचायतींमध्ये कर्जत तालुक्यातील आठ, तर जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश होता. मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणूका अगामी बाजार समिती निवडणुकांची लिटमस चाचणी होती.

यात पवार बाजी मारणार की शिंदे यावर पुढील रणनिती ठरणार, असेच बोलले जात होते. निकालात आमदार राम शिंदे यांनी बाजी मारली. मतदारसंघात आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 11 पैकी सात गावांवर कब्जा मिळवला. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांचा उत्साह अधिकच द्विगुणावला आहे. राष्ट्रवादीचे तुटपुंजे यश आमदार रोहित पवारांना धक्का देणारे ठरले.

मतदारसंघातील शिऊर, अळसुंदे, कापरेवाडी, म्हाळंगी, मुळेवाडी, कौडाणे या ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले. बहिरोबावाडीत भाजपामित्रपक्षाचा सरपंच झाला. कोपर्डीत अपक्ष सरपंच झाला. राजुरी, निंबे गावात सरपंच राष्ट्रवादीचा झाला; परंतु बहुमत भाजपला मिळाले. राष्ट्रवादीचे रत्नापूर, राजुरी आणि निंबे या तीन गावांत सरपंच झाले. रत्नापूरमध्ये राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत आहे.

Back to top button