नगर : अत्याचार प्रकरणी नराधमास सक्तमजुरी | पुढारी

नगर : अत्याचार प्रकरणी नराधमास सक्तमजुरी

नगर; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश एम. ए. बरालिया यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. सोमनाथ भानुदास म्हस्के (वय 28, रा. उक्कडगाव ता. जि अहमदनगर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 14 फेब्रुवारी 2020 रोजी पीडित अल्पवयीन मुलगी शेतात जात असताना आरोपीने तिला बाजूच्या शेतात नेत अत्याचार केला होता.

4 जुलै 2020 रोजी पीडितेला शेतात नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. 2021 च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीडितेला त्रास होत असल्याने तिच्या आईने दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेले. तेव्हा डॉक्टरांनी पीडिता गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर स्नेहालयाच्या पुढाकारातून नगर तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक डी. आर. जारवाल व आर. एन. राऊत यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडिता, पंच, वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी व तपासी अमंलदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. सतिश पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार के. एन. पारखे यांनी सहकार्य केले.

Back to top button