नगर : प्रस्थापितांना चपराक अन् नव्या राजकीय समीकरणाची दिशाही | पुढारी

नगर : प्रस्थापितांना चपराक अन् नव्या राजकीय समीकरणाची दिशाही

संदीप रोडे

नगर : जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी लागले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे निकाल महत्त्वाचे असल्याने राजकीय पक्षाकडून सत्तेचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या निकालातून वर्षानुवर्षे सत्तेला चिकटून बसलेल्या प्रस्थापितांची सद्दी संपुष्टात आणत मतदारांनी नवोदितांना कौल देत दमदार राजकीय एन्ट्री करण्याला साथ दिली. बहुतांश नेत्यांनी वारसदारांचे लॉजिंग करण्याची संधी साधली. एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकीचा अन्वयार्थ लावयाचा झाल्यास प्रस्थापितांना चपराक तर नव्या राजकीय समीकरणाची दिशाही या निवडणुकीने अधोरेखित केल्याचे दिसून येते.

अटीतटीच्या लढती झाल्याने गावाची सत्ता राखताना प्रस्थापितांची दमछाक झाल्याचे दिसून आले. बहुतांश गावात मतदारांनी प्रस्थापितांना नाकारत नवोदितांना संधी दिल्याचेही दिसून आले. खरेतर गावची निवडणूक ही पक्षीय पातळीचे नसतेच, स्थानिक पातळीवरील ‘फेस’ भोवताली ती फिरत असते. पण आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नेत्यांनी अनेकांना ‘रसद’ पुरविली. भविष्यातील राजकारणात आडकाठी ठरू पाहणार्‍या राजकीय शत्रुचे उट्टे काढण्यासोबतच त्यांची कोंडी करण्याची संधी प्रस्थापित नेत्यांनी निवडणुकीआडून साधली.

श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात स्व. सदाअण्णा पाचपुते यांचे चिरंजीव साजन यांचा उदय झाला. काका आ. बबनराव पाचपुते यांच्याविरोधात लढताना त्यांना विरोधकांचे पाठबळ लाभले. अर्थात त्यामागे आ. पाचपुते यांचे सत्तासंस्थान खालसा करण्याचा उद्देश असल्याचे लपून राहिले नाही. आ. शंकरराव गडाख यांनी नेवाशातील 13 गावाववर वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले. भाजपचे माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या मेहुण्याच्या ताब्यातील कांगोणी ग्रामपंचायतही गडाखांनी हिसकावून घेतली.

वडाळा बहिरोबात ललित मोटे या नवनेतृत्वाचा उदय झाला. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले यांच्या पॅनेलचा पराभव करत भेंडेकरांनी सत्ता परिवर्तन केले. पारनेरवरची पकड आ. नीलेश लंके यांनी सैल होऊ दिली नाही. 16 पैकी 12 ग्रामपंचायतीवर आ. लंकेंनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविला. भाळवणीत मात्र बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकला. पाथर्डीच्या तिसगावावरील काशिनाथ लवांडे यांची 40 वर्षांपासूनची सत्ता मतदारांनी उलथून टाकली. तिसगावकरांनी प्रथमच मुस्लीम समाजाच्या हाती गावचे नेतृत्व सोपविले.

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी सर्वाधिक ग्रामपंचायती काबीज केल्या असल्या तरी राष्ट्रवादीचे अ‍ॅड. प्रतापकाका ढाकणे यांची मुसंडीही दुर्लक्षून चालणारी नाही, याचाही संदेश पाथर्डीकरांनी दिला. आ. राजळे यांच्याच मतदारसंघातील शेवगाव तालुक्यात मात्र राष्ट्रवादीने जोरकसपणे मुसंडी घेतली. माजी आमदार घुले बंधूंनी 8 तर आ. राजळे गटाला तीन ग्रामपंचायतीची सत्ता मिळाली. काकडे यांच्या जनशक्ती विकास आघाडीनेही अस्तित्व दाखवून दिले. कर्जतमध्ये आ. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने वेगाने घोडदौड करत राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांना चपराक दिली. श्रीगोंद्यातही राष्ट्रवादीने वर्चस्व राखण्यात यश मिळविले.

श्रीरामपुरात आदिक-ससाणे तर काही ठिकाणी मुरकुटे-ससाणे गटाने सत्ता मिळविली. कोपरगावात सर्वाधिक जागा जिंकत भाजपच्या कोल्हे गटाने वर्चस्व सिद्ध केले. भाजपचे पिचड पिता-पुत्रांपेक्षा जास्त गावांवर सत्ता राखत अकोल्यातही राष्ट्रवादीचे आ. किरण लहामटे गटाने गड राखला. राहाता तालुक्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर संगमनेरात माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी वर्चस्व सिद्ध केले. मात्र दोघांनीही एकमेकांच्या बालेकिल्यात शिरकाव केल्याचेही समोर आले.

संगमनेरात ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या सासूबाईंनी सरपंचपदाच्या माध्यमातून राजकारणात पाऊल टाकले. राहुरी तालुक्यावर आ. प्राजक्त तनपुरे यांनी वर्चस्व दाखविले तर भाजपनेही जोरदार कमबॅक करत तनपुरेंचे प्रतिस्पर्धी माजी आ. शिवाजी कर्डिले यांचाही उत्साह वाढविला. कर्डिले यांनी नगर तालुक्यावरील कमांड पुन्हा एकदा दाखवून देत आगामी राजकीय लढाईचे संकेत दिले आहेत.

भाजपची मुसंडी, राष्ट्रवादीने गड राखले
सर्वाधिक ग्रामपंचायतीवर सत्ता आल्याचा दावा भाजप, राष्ट्रवादीकडून सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी 83 तर भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी 73 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकल्याचा दावा केला आहे. काँग्रेस तिसर्‍या स्थानावर तर शिवसेना चौथ्या नंबरवर फेकली गेली. या निवडणुकीने काँग्रेस, शिवसेनेवर आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारली तर राष्ट्रवादीनेही गड राखल्याने आगामी निवडणुका चुरशीच्या होतील, यात
शंका नाही.

या नवोदितांची एन्ट्री
साजन सदाशिव पाचपुते, ऋषीकेश अण्णासाहेब शेलार, डॉ. सुनीता फलके, साहेबराव शेडाळे, सुप्रिया विराज भोसले, संदीप देशमुख, बाळासाहेब मोहनराव पालवे, मुकुंद आंधळे.

यांची सत्ता संपुष्टात
आ. बबनराव पाचपुते, राहुल झावरे, काशिनाथ लवांडे, बाबाजी तरटे, काशिनाथ नवले, माणिकराव खेडकर यांची
सत्त्ता संपुष्टात.

Back to top button