कर्जत : आ. शिंदे यांचा आ.पवार यांना धक्का ; कर्जत तालुक्यात भाजपने पुन्हा प्रस्थापित केले वर्चस्व

कर्जत : आ. शिंदे यांचा आ.पवार यांना धक्का ; कर्जत तालुक्यात भाजपने पुन्हा प्रस्थापित केले वर्चस्व

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना भाजपचे माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी धक्का दिला आहे. आठ ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालामध्ये आ. शिंदे व भाजपने तालुक्यात वर्चस्व मिळविल्याचे दिसून आले. यावेळी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला असून, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांच्या गटाचा त्यांच्या स्वतःच्या आळसुंदे गावात पराभव झाला. तर, दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुकाप्रमुख बळीराम यादव यांनी दोन सरपंच निवडून आणले आहेत. भाजप व राष्ट्रवादीकडून आपल्याच पक्षाच्या जास्त जागा निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्यामुळे तालुक्यातील आठही ग्रामपंचायतींमध्ये यावेळी मोठ्या प्रमाणात चुरस दिसून आली. तालुक्यातील आठही ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये कोणाची वर्चस्व राहणार याविषयी मोठी उत्सुकता होती. या निवडणुकीमध्ये आ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बाजी मारल्याचे दिसून आले.

कौडाणेते भाजप-शिवसेना युती

राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. भाजपने थेट उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पाडून त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केल्यानंतर हा संघर्ष आणखीन टोकदार झाला आहे. असे असले तरी कर्जत तालुक्यातील या ग्रामपंचायतीमध्ये मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व भाजपची युती या निवडणुकीत देखील कायम होती. या युतीने राष्ट्रवादी काँग्रेसचा येथे पराभव केला.

कोपर्डीत महाविकास आघाडी विजयी

कर्जत तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या कोपर्डी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कुमजाई माता ग्रामविकास परिवर्तन पॅनल चमत्कार घडवून या ठिकाणी सत्ता बदल केला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपचा पराभव केला आहे. सरपंचपदी शांतीलाल सुद्रिक हे मोठ्या फरकाने विजयी झाले.

मुळेवाडीमध्ये भाजपचा झेंडा
तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेल्या मुळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपच्या जय भवानी ग्रामविकास पॅनलने एकहाती सत्ता मिळवित राष्ट्रवादीचा पराभव केला. सरपंचपदी भाजपच्या शीतल दत्तात्रय मुळे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. या ग्रामपंचायतीत भाजपने आठ पैकी सात जागा जिंकल्या. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कर्जत शहरांमधून गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूक समर्थकांनी काढली यामध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर हे सहभागी झाले होते.

आळसुंदेत काँग्रेसला धक्का
कर्जत तालुक्यातील सर्वात धक्कादायक निकालाची नोंद आळसुंदे ग्रामपंचायतीत झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांच्या गटाची पंधरा वर्षे येथे सत्ता होती. मात्र, यावेळी परिवर्तन झाले असून मरीमाता ग्राम विकास पॅनलने 11 पैकी आठ जागा जिंकल्या. सरपंचपदी स्मिता जिजाबापू अनारसे या तब्बल 435 मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या.

निंबेमध्ये राष्ट्रवादीची बाजी
निंबे येथे राष्ट्रवादीचे बाबासाहेब कोपनर यांनी एक हाती विजय मिळविताना भाजपचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या बाळूबाई बाबासाहेब कोपनर यासरपंचपदी विजयी झाल्या. निकाल जाहीर होताच समर्थकांनी कर्जत शहरांमध्ये मोठा जल्लोष केला.

अशोक खेडकर ठरले निर्णायक
माळगी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर हे पुन्हा एकदा निर्णायक ठरले. त्यांच्या गटाने येथे विजय मिळवला. या परिसरावर खेडकर यांच्या गटाचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. भाजपचे शांतीलाल मासाळ या ठिकाणी मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले.

बहिरोबावाडीत ठाकरे गटाचे वर्चस्व
बहिरोबावाडी ग्रामपंचायतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख बळीराम यादव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विजय मिळविला आहे. कोमल शरद यादव या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्या. येथे दोन्ही गट एकत्र आले होते. येथील सहा उमेदवार यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले होते. काल या गटाचे आणखी दोन उमेदवार विजयी झाल. विरोधी गटाला एक जागा मिळाली.
तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींची मतमोजणी तहसील कार्यालयात पार पडली. जसा जसा निकाल बाहेर येत होता, तसे उमेदवार, त्यांचे समर्थक कार्यकर्ते एकच जल्लोष करीत होते.

कर्जत तालुक्यातील आठपैकी पाच ग्रामपंचायती जिंकून आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
                                                          – नामदेव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस

भाजपने माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आठपैकी सहा ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. हा आ.रोहित पवार व राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे.
                                         -अशोक खेडकर, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news