घोडेगावचा जनावरांचा बाजार सुरू ; शेतकरी व्यापार्‍यांमधून समाधान | पुढारी

घोडेगावचा जनावरांचा बाजार सुरू ; शेतकरी व्यापार्‍यांमधून समाधान

घोडेगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद असलेला घोडेगावचा जनावरांचा बाजार शुक्रवार दि.23 डिसेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आता गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांचा बाजार नियमित सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक, व्यापारी, दलाल व व्यवसायिकांनी बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार शंकरराव गडाख यांचे आभार मानले. जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी लंपी आजाराने थैमान घातले होते. या घातक आजाराने नेवासा तालुक्यात देखील अनेक शेतकर्‍यांची जनावरे मरण पावली. आजाराचा वाढता प्रसार व घातकता लक्षात घेता, प्रशासनाच्या वतीने दि. 9 सप्टेंबर 2022 पासून घोडेगाव येथील जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या विविध उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपचार, लसीकरण यामुळे लंपी आजार आटोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाची बाजार पूर्ववत करण्याची मागणी होती.

आमदार गडाख यांच्याकडे शेतकरी व व्यापारी बाजार सुरू करण्याची मागणी करत होते. त्यावेळी लवकरच बाजार सुरू होईल, असा शब्द आ.गडाख यांनी शेतकरी व व्यापार्‍यांनी दिला होता. दरम्यान, बाजार सुरू करण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन बाजार सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. शुक्रवारपासून हा बाजार सुरू करण्यात येणार आहे. अनेक महिन्यापासून बाजार बंद असल्याकारणाने बाजारावर अवलंबून असणार्‍या सर्व घटकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. गाई, म्हशी विक्री करण्यावर निर्बंध असल्याने अनेकांना अडचण जाणवत होती. शेतकर्‍यांना व पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला. आता बाजार सुरू होत असल्याने समाधानाचे वातावरण आहे.

घोडेगाव येथील जनावरांच्या बाजारावर नेवासा तालुक्यासह, जिल्ह्यातील अनेक गावांचे अर्थकारण अवलंबून आहे. सदर बाजार तातडीने सुरू व्हावा, यासाठी आ. गडाख यांनी प्रयत्न केले. सदर बाजार सुरू होणार असल्याने समाधानाचे वातावरण आहे. आम्ही सर्वजण आ. गडाख यांचे आभार मानतो.
                                                  -वसंतराव सोनवणे ,म्हैस व्यापारी, घोडेगाव

 

Back to top button