नगर : पथदिवे योजनेला लागलंय ग्रहण ; योजनेतील अर्ध्याहून अधिक पथदिवे बंद | पुढारी

नगर : पथदिवे योजनेला लागलंय ग्रहण ; योजनेतील अर्ध्याहून अधिक पथदिवे बंद

घोडेगाव : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील घोडेगाव मध्ये ग्रामपंचायतीने उभारलेल्या पथदिवे योजनेला ग्रहण लागले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली योजना बंद पडली असून, रात्रीच्या वेळी गावामध्ये अर्ध्याहून अधिक पथदिवे बंद असल्याने अंधारच अंधार असतो. नगर-औरंगाबाद महामार्गावर माजी सरपंच पुष्पा संदीप कुर्‍हाडे यांच्या कार्यकाळात शनिचौक ते घोडेश्वरी माध्यमिक विद्यालयापर्यंत पथदिवे उभारण्यात आले होते. यासाठी 15 लाखांहून अधिक खर्च करण्यात आला होता. या पथदिव्यांमुळे रस्त्यावर प्रकाश असल्यानेे व्यावसायिक ग्रामस्थांना व प्रवाशांना फायदा होत होता. लख्ख प्रकाशाने गावाच्या वैभवात भर पडली होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून ही योजना सतत बंद असते.

यातील अनेक पथदिवे बंद पडले आहेत, तर अपघातामुळे अनेक खांब पडले आहेत. ग्रामपंचायतीचे लक्ष नसल्याने लाखो रुपयांची योजना जीर्णावस्थेत सापडली आहे.  दिवे कधी चालू तर कधी बंद असल्याने गावात चोर्‍यांचे प्रमाण वाढत आहे.  यापूर्वी गावात बँक ऑफ बडोदा फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या आठवड्यात गावातील सबमर्शिबल पंप दुरुस्तीचे दुकान फोडून हजारो रुपयांची चोरी झाली. गावात अनेक लहान मोठ्या चोर्‍या होत आहेत. गावात प्रसिद्ध कांदा मार्केट असून, आठवड्यात तीन दिवस रात्रभर कांदा आवक सुरू असते. मात्र, पथदिवे बंद असल्याने अंधारामुळे अपघात होत आहेत. बाजारपेठेतील महत्त्वाचे गाव असल्याने, लाखो रूपये खर्च केलेल्या या पथदिवे योजनेकडे ग्रामपंचायतीने लक्ष घालून ती पूर्ववत करावी. पडलेले खांब पुन्हा उभे करून महामार्गावरील पथदिवे पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Back to top button