नगर : चेन स्नॅचिंग लुटारूंचे पोलिसांना चॅलेज ! दिवसाढवळ्या दुचाकीस्वार लुटारूंचा हैदोस | पुढारी

नगर : चेन स्नॅचिंग लुटारूंचे पोलिसांना चॅलेज ! दिवसाढवळ्या दुचाकीस्वार लुटारूंचा हैदोस

नगर : पुढारी वृत्तसेवा : चेन स्नॅचिंगच्या दरदिवशी होणार्‍या घटनांमुळे शहरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. दिवसाढवळ्या महिलांचे दागिने ओरबाडून नेले जात असल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुचाकीस्वार लुटारूंनी एकप्रकारे नगर पोलिसांना चॅलेज दिले असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. शहरातील एकविरा चौकातून तपोवन रोडकडे मोपेड दुचाकीवरून जात असताना दुचाकीस्वार चोरट्यांने महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण लांबविल्याची घटना रविवारी (दि.18) सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत शोभा सुधाकर कल्पपुरे (रा. शिवनगरजुना पपिंळगाव रोड, सावेडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी बाजारात भाजीपाला आणण्यासाठी मुलासोबत गेल्याअसता दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांने त्यांच्या गळ्यातील 45 हजार किमतीचे गंठण ओरबाडून नेले.  यापूर्वी शुक्रवारी (दि.16) दुपारी गुलमोहर रोडने पायी जाणार्‍या महिलेचे मंगळसूत्र ओरबाडून नेल्याची घटना घडली होती. गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील तोफखाना, कोतवाली हद्दीत चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढले असून पोलिसांना चोरटे गजाआड करण्यात अपयश येत असल्याचे वास्तव आहे.

महिलांनी खबरदारी घेणे आवश्यक

चेन स्नॅचिंग सारख्या घटना रोखण्यासाठी महिलांनी आवश्यक ती खबरदारी घेणे, गरजेचे बनले आहे. माळीवाडा परिसर, बुरुडगाव रस्ता, सावेडीतील पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक परिसर, गुलमोहोर रस्ता, प्रोफेसर कॉलनी रस्ता, तपोवन रस्ता, बालिकाश्रम रस्ता अशा ठरावीक ठिकाणी चेन स्नॅचिंगचे प्रकार घडले आहेत.

पोलिस अधीक्षकांसमोर आव्हान

शहरात चोरट्यांनी काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. घरफोडी, जबरी चोरी, दुचाकी चोरी, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणे, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे. अशा घटना थांबविण्याचे व त्यांचा तपास लावण्याचे आव्हान पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यापुढे उभे राहिले आहे.

Back to top button