कर्जत : आठ ग्रामपंचायतीसाठी 89.55 टक्के मतदान | पुढारी

कर्जत : आठ ग्रामपंचायतीसाठी 89.55 टक्के मतदान

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी 89.55 टक्के मतदान झाले. तालुक्यातील आठ ग्रामपंचायतची निवडणूक शांततेने पार पडली. यामध्ये 15 हजार 88 पैकी 13 हजार 512 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्यामध्ये चुरस असून, कोण बाजी मारणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. आठही ग्रामपंचायतींसाठी मोठ्या उत्साहात मतदान झाले. जनतेतून सरपंच निवड होत असल्यामुळे यावेळी आठही ग्रामपंचायतीमध्ये मोठी चुरस दिसून आली.

मतदानासाठी सकाळपासूनच मतदान केंद्राच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. दुपारपर्यंतच अनेक ग्रामपंचायत मध्ये 80टक्केपेक्षा जास्त मतदान झाल्याचे दिसून आले. मतदान संपेपर्यंत 90 टक्के मतदान तालुक्यामध्ये झाल्याचे दिसून आले. तालुक्यातील आठही ग्रामपंचायतीसाठी विक्रमी मतदानाची नोंद यावेळी झाली आहे. मतदारांना आणण्यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक धावपळ करत होते. वयोवृद्ध व्यक्ती, अपंग यांचे देखील मतदान राहणार नाही, याची काळजी यावेळी घेण्यात येत होती.  सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्राते बंद झाले असून, मंगळवारी तहसील कार्यालयात होणार्‍या मतमोजणीकडेे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्जत तालुक्यातील गावनिहाय मतदान

कोपर्डी 92.87 टक्के, नींबे 95.76, आळसुंदे 93.18, कापरेवाडी 94.77, माळंगी 19.78, बहिरोबा वाडी 85.60, मुळेवाडी 92.11, कवडणे 90.99 टक्के.

Back to top button