नेवासा : शासनाची फसवणूक; ट्रक मालकावर गुन्हा | पुढारी

नेवासा : शासनाची फसवणूक; ट्रक मालकावर गुन्हा

नेवासा : पुढारी वृत्तसेवा  :  दोन वाहनांना एकच नोंदणी क्रमांक वापरून ट्रकच्या मालकांनी शासनाचा महसूल चुकवून फसवणूक केल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भातकुडगाव (ता. शेवगाव) येथील ट्रक मालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटारवाहन निरिक्षक सुनील भाऊसाहेब गोसावी यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, स्पीडगन पथक प्रमुख म्हणून कार्यालयाने नेमणूक केली आहे. या पथकासहा मोटारवाहन निरीक्षक सुरेश शिंदे व चालक गणेश गांगोडे होते. यावेळी रस्त्यावरील ओव्हरलोड वाहनांची कागदपत्रे चेक करणे, महसुल वसुल करणे व दंडात्मक कारवाई करणे, याची कारवाई करताना वाहनांची तपासणी केली असता शुक्रवारी (दि.16) श्रीरामपूर रस्त्यावर सुरेगाव फाटा येथे थांबून कारवाई केली. यावेळी या पथकाला (एम.एच.20 ए 1952) नंबरचा रिकामा ट्रक थांबवून तपासणी केली. यावेळी त्याच्याकडे कागदपत्रे नव्हती, तसेच वाहन चालविण्याचा परवानाही नव्हता, यामुळे त्याची चौकशी केली असता त्याने नाव शाहुल मारुती भालके (रा.मजलेशहर, ता.शेवगाव), असे सांगितले.

त्यास वाहनाचे मुळ मालकाचे नाव विचारले, त्याने लक्ष्मण शिवाजी चौधरी (रा. भातकुडगाव, ता. शेवगाव), असे सांगीतले. इ-चालन मशीनवर वाहनाचा नोंदणी क्रमांक तपासला असता मुळ मालकाचे नाव लक्ष्मण शिवाजी चौधरी, असे दिसून आले. त्याच्याकडे वाहनाची
कागदपत्रे नसल्याने वाहनाचा चेसी नंबर चेक केला. तो बनावट प्रिंट केल्याचे दिसून आले. तसेच, इंजीनचा नंबर तपासला असता त्याचीही प्लेट ही काढून घेतल्याचे आढळले. यावरून हा ट्रक डुप्लीकेट असल्याचे खात्री झाली. तसेच, दुसर्‍या वाहनाचा नोंदणी क्रमांक टाकून शासनाचा महसुल चुकवून फसवणूक केल्याचे उघडकीस आले. यामुळे ट्रक मालकाविरोधात नेवसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button