अविनाश येळवंडे :
घोडेगाव : नेवासा तालुक्यातील पांढरीपूल, शिंगवेतुकाई परिसरात अवैध धंदे पुन्हा जोमात सुरू झाले असून, पांढरीपूल परिसरातील काही हॉटेलमागे अवैध स्टीलची विक्री जोमात असून, हे स्टील खरेदीसाठी नगर शहरासह दुसर्या जिल्ह्यातील मोठ-मोठे व्यापारी येत असल्याची माहिती समोर आली आहे. पांढरीपुल व शिंगवेतुकाई परिसरातील नगर-औरंगाबाद महामार्गावर अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत. काही हॉटेलच्या मागे स्टील, चोरीची मका, डिझेल-पेट्रोलची खरेदी विक्री राजरोसपणे होत आहे. प्रशासनाचे कुठलेही भय न बाळगता होणार्या या घटनांकडे नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला लक्ष देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पांढरीपूल परिसरातील हा उद्योग दिवस-रात्र राजरोसपणे सुरू असल्याने सर्वसामान्यांकडून आश्चर्य होत आहे.
पांढरीपूल परिसरात नगर-औरंगाबाद मार्गावर अनेक हॉटेल व ढाबे आहेत. यातील दोन ते तीन हॉटेल व ढाब्यांवर रोज कंपन्यांचे बांधकाम व अन्य प्रकारच्या स्टीलची वाहतूक करणारे ट्रक व कंटेनर थांबतात. हॉटेल चालकांचे या ट्रक चालकासोबत लागेबांधे आहेत. याठिकाणी बांधकाम स्टील अतिशय कमी दरात खरेदी करून, तत्काळ म्हणजेच सकाळपर्यंत चढ्या दराने विक्री केली जाते. ट्रकमधून काही प्रमाणात स्टील उतरवून घेऊन ट्रक चालकास त्याचे पैसे देऊन तो कंटेनर रवाना केला जातो. अशा प्रकारे रोज शेकडो कंटेनर व ट्रक हॉटेल व ढाब्यांवर स्टील व अॅल्युमिनियम मटेरियल, मका व डिझेल, पेट्रोल कमी किमतीत खाली करून जातात. स्टील खरेदी करण्यासाठी नगर शहर, नेवासा तालुक्यातून मोठ-मोठे व्यापारी येतात. या हॉटेल चालकांकडून कमी दरात स्टील घेऊन बांधकाम मटेरियलच्या दुकानात चढ्या भावाने ग्राहकांना विक्री करत आहेत. व्यापार्यांना या खरेदी-विक्रीत कसलाही टॅक्स द्यावा लागत नसल्याने, त्यांचे फावत आहे; परंतु शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. नगर शहर व जिल्ह्यातील मोठे बांधकाम व्यवसायिक कमी दरात स्टील खरेदीसाठी प्राधान्य देतात. त्यांना इथूच स्टील पुरविले जात असण्याची शक्यता नकारता येत नाही.
'जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालावे'
पांढरीपूल व शिंगवेतुकाई परिसरात मोठे रॅकेट असून, या व्यवसायांवर पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई होण्याची नागरिकांना अपेक्षा आहे. पोलिस प्रशासनाकडून अद्याप कुठलीही मोठी कारवाई झालेली नाही. नूतन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या अवैध उद्योगांकडे लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
अवैध व्यवसायाची पाळेमुळे खोलवर
जालना शहरात स्टील निर्मितीच्या खूप मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून शेकडो ट्रक स्टील पुणे, मुंबईसह इतर मोठ्या शहरांत वितरित होते. राज्यभर मोठा ट्रान्सपोर्ट व्यवसाय चालतो. कंपनीत स्टील भरताना व उतरविताना ट्रकमध्ये डिझेल कमी अधिक ठेवणे, वाळूच्या गोण्या ठेवणे यासह अनेक फंडे वापरले जातात. यामुळे कंपन्यांना देखील मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यामध्ये अधिकार्यांचे लागेबांधे असल्याचीही चर्चा आहे. लाखो रुपयांचा काळाबाजार होणार्या या व्यवसायात अनेक मोठे व्यापारी आहेत. सर्वत्र पैशाचे वितरण होत असल्याने काळा व्यवसाय राजरोसपणे दिवसाही केला जातो. भंगार दुकान दाखवून मुख्य व्यवसाय अवैध स्टील,अॅल्युमिनियमचा होत आहे..
अवैध पेट्रोल-डिझेलची खरेदी-विक्री
पांढरीपूल परिसरात पेट्रोल, डिझेल कंपनीच्या टँकर व ट्रान्सपोर्टच्या गाड्या यांच्याकडून अवैध पेट्रोल-डिझेल खरेदी थांबलेली नाही. जनावरांचे पशुखाद्य व बी-बियाणे कंपन्यांना पुरवठा केला जाणार्या मकाची खरेदी कमी दरात करून परिसरात विक्री केली जाते. यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. यामागे असणार्या आर्थिक तडजोडीतून या व्यवसायांकडे सर्रास जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची परिसरात चर्चा आहे. परिसरातील या अवैध व्यवसायातून टोळीयुद्ध, गुन्हेगारी वाढत असून, परिसरात शांतता राखण्यासाठी स्टील, मका व डिझेल विक्रीवर कारवाई अपेक्षित आहे.