नगर : 149 परवानाधारकांची शस्त्रे केली जाणार जमा
नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरु असून, निवडणूक निर्भयतेच्या वातावरणात व्हावी, यासाठी खबरदारी म्हणून 149 शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे जमा होणार आहेत. यामध्ये काष्टी, वाळकी गावांतील सर्वाधिक शस्त्र परवानाधारकांचा समावेश आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्या ग्रामपंचायतींसाठी गेल्या आठ दिवसांपासून प्रचार सुरु आहे. रविवारी (दि.18) मतदान होणार असून, मंगळवारी मतमोजणी होणार आहे. सर्वसामान्य जनतेला निर्भय वातावरणात मतदान करता यावे तसेच मतमोजणी झाल्यानंतर गावागावांत वाद निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.
त्यासाठी आवश्यक असणार्या उपाययोजना पोलिस प्रशासनाच्या वतीने सुरु आहेत.जिल्ह्यातील जवळपास 4 हजार व्यक्ती शस्त्रपरवानाधारक आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिस प्रशासनाने 227 शस्त्रपरवानाधारकांचे शस्त्र जमा करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे आठ दिवसांपूर्वी पाठविला होता. ज्या ठिकाणी शांततेत प्रचार सुरु आहे. मतदान देखील शांततेत होण्याची शक्यता आहे. अशा गावांतील शस्त्रे जमा करण्याची गरज नाही.
कोणत्या गावांतील वातावरण तंग आहे. याची पाहणी करुनच नवीन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी पोलिस प्रशासनाला दिले होते. त्यानंतर पोलिस प्रशासनाने चाळणी करुन नगर, राहाता, शेवगाव, कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा व कर्जत या सात तालुक्यांतील 149 शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे जमा करण्याबाबत प्रस्ताव शुक्रवारी (दि.16) दाखल केला आहे. या प्रस्तावास जिल्हा दंडाधिकारी डॉ. भोसले यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार पोलिस प्रशासनाच्या वतीने यांच्यासह 149 शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे निवडणुका संपेपर्यंत जमा करुन घेतली जाणार आहेत.
काष्टीतील 56 शस्त्रांचा समावेश
सध्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी, नगर तालुक्यातील वाळकी येथील निवडणूक अटीतटीची सुरु आहे. त्यामुळे काष्टी येथील आमदार बबनराव पाचपुते, भगवान पाचपुते, कैलास पाचपुते यांच्यासह 56, तसेच वाळकी येथील 19 शस्त्रपरवानाधारकांची शस्त्रे जमा होणार आहेत.

