नगर : निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज | पुढारी

नगर : निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजवावा. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज असून, मतदान केंद्रावर उमेदवार अथवा अन्य कोणी व्यक्ती वारंवार फिरणार नाही, याचा काळजी घेतली जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत कोणी बाधा आणल्यास गय केली जाणार नाही. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी तथा पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर यांनी दिली. पाथर्डी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला सकाळी साडे सात ते सायंकाळी पाचच्या दरम्यान मतदान केले जाणार आहे.

निवडणुकीसाठी ईव्हीएम सेट केले असून, त्या सील करून पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. 41 मतदान केंद्रावर मतदान केले जाणार आहे. 17 डिसेंबर रोजी सर्व मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी व मतदान यंत्रे बसद्वारे पोहोच केले जाणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व अधिकारी नेमलेले असून, अन्य कर्मचारी असे एकूण 228 मदतीला असणार आहेत. तीन झोनल अधिकारी तसेच नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, मुरलीधर बागुल, अनिल तोरडमल, संजय माळी यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी निवडणुकीचे कामकाज पाहत आहेत.

तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदाच्या अकरा जागांसाठी 33 उमेदवार आहेत. सदस्यांच्या एकशे नऊ जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित शंभर जागांसाठी 240 उमेदवार उभे आहे. मोहरी, वडगाव, सोनोशी, कोळसांगवी, निवडुंगे, भालगाव, वैजूबाभूळगाव, कोरडगाव, कोल्हार, तिसगाव, जिरेवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी मतदान होणार आहे. मतमोजणी 20 डिसेंबर रोजी पाथर्डी तहसील कार्यालयात नऊ टेबलवर पार पडणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Back to top button