पारनेर : सोळा गावांत सरपंचपदाची लढाई

पारनेर : सोळा गावांत सरपंचपदाची लढाई
Published on
Updated on

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील सोळा गावांतील ग्रामपंचायत निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून, दि. 18 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच गावामध्ये राजकीय धुळवड उडाली आहे. दोन्ही गटांकडून आपणच निवडून येणार असल्याचा विश्वास मतदारांना देण्यात येत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी गाव पुढार्‍यांकडून ओल्या जेवणावळींच्या पंगती हॉटेल व ढाबा अशा ठिकठिकाणी पडत आहेत. त्यामुळे मतदारांची सध्या थंडीमध्ये चंगळ झाली असून, काही मतदार तर झिंगाट झाले आहेत.
पारनेर तालुक्यामध्ये 16 गावांत ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा पाहायला मिळत आहे.

बर्‍याचशा गावांमध्ये दुरंगी व काही गावात तिरंगी, चौरंगी लढती असल्याने नेमका कोण उमेदवार विजयी होईल, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तालुक्यात 16 गावातून 46 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहेत. यामध्ये म्हस्केवाडी येथे सरळ लढत होत असून, त्यात आशा किरण पानमंद व अंकिता अविनाश पानमंद हे सरपंच पदासाठी उमेदवार आहेत. करंदी येथे नंदा भास्कर गव्हाणे, रेखा शरद गोरे व शुभांगी लक्ष्मण ठाणगे यांच्यात सरपंच पदासाठी तिरंगी लढत होत आहे. पिंपळगाव तुर्क येथे प्रियंका अमोल गवळी व सुलोचना सावकार शिंदे यांच्यात सरळ लढत आहे. पुणेवाडी येथे बाजार समितीचे माजी संचालक मारुती रेपाळे यांच्या पत्नी दीपाली रेपाळे व वर्षा अमोल रेपाळे यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे.

भोंद्रे येथे जयश्री विशाल झावरे व प्रतिक हरिभाऊ झावरे हे उमेदवार आहेत. गोरेगाव येथे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या पत्नी विद्यमान सरपंच सुमन तांबे यांच्या विरोधात कविता बापू नरसाळे अशी सरपंच पदासाठीची लढत होत आहे. या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

पळशी येथे प्रकाश बबन राठोड व आप्पासाहेब गंगाधर शिंदे हे दोन उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहेत. वनकुटे येथे आत्मा कमिटीचे अध्यक्ष व विद्यमान सरपंच राहुल झावरे यांच्या पत्नी स्नेहा झावरे, अनिता दीपक गुंजाळ व सुमन निवृत्ती रांधवन अशी तिरंगी लढत होत आहे. हत्तलखिंडी येथे गजराबाई उत्तम गायकवाड व शैला दामू शेळके यांच्यात सरळ लढत होत आहे.

सिद्धेश्वरवाडी येथे शीतल संतोष कावरे व विद्यमान सरपंच युवराज गुंजाळ यांच्या पत्नी दर्शना गुंजाळ यांच्यात सरळ लढत होत आहे. चोंभुत येथे कांचन दत्तात्रय म्हस्के व सुनिता गंगाधर शेळके यांच्यात थेट लढत होत आहे. कोहकडी येथे विमल तुळशीराम गायकवाड, वृषाली सुदाम टोणगे, सीमा अरुण पवार व मनीषा वसंत चौधरी अशी चौरंगी लढत होत आहे. गुणोरे येथे दीपक दादाभाऊ सातपुते, राधुजी महादू साळवे व सुरेश वामन सातपुते अशी तिरंगी लढत होत आहे. पाडळीतर्फे कान्हूर येथे वैशाली हरीश दावभट व इंदुबाई शंकर सिनारे यांच्या थेट सामना होत आहे.

तालुक्यातील भाळवणी येथे सरपंच पदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिंदे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख बंडू रोहकले यांच्या मातोश्री विद्यमान सरपंच लिलाबाई भाऊसाहेब रोहकले, बबनराव रभाजी चेमटे, बाबासाहेब नामदेव चेमटे, बबनराव रंगनाथ डावखर व अशोक शिवाजी रोहकले असे पाच उमेदवार रिंगणात आहेत. ढवळपुरी येथे नंदा भागाजी गावडे, सुनिता सुखदेव चितळकर व विद्या राजेश भानगडे अशी तिरंगी लढत होत होती. मात्र, विद्यमान सरपंच डॉ. राजेश भानगडे यांच्या विरोधात गावडे व चितळकर यांनी एकत्र येत गावडे यांना पाठिंबा दिला असल्याने गावडे व भानगडे अशी थेट लढत होत आहे.

गावात विकास आणायचा असेल तर जो उमेदवार पाच वर्षे मेहनत घेईल, गावचा विकास करील व गावातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन त्यांच्या मूलभूत गरजांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेईल, अशा उमेदवारांच्या पाठीशी मतदारांनी उभे राहणे गरजेचे आहे. मात्र, असा उमेदवार ओळखायचा कसा, हा मोठा प्रश्न मतदारांना आहे. प्रचारात प्रत्येक उमेदवार एकच ध्यास गावचा विकास असा नारा लावीत असतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news