नेवाशातील सात गावांत राजकीय धुरळा | पुढारी

नेवाशातील सात गावांत राजकीय धुरळा

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यात 13 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली असली, तरी खरी रणधुमाळी आहे, ती राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या वडाळा बहिरोबा ग्रामपंचायत निवडणुकीत. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले असून, येथे सत्ताधार्‍यांसमोर विरोधकांनी भक्कम आव्हान उभे केले. यामुळे कांटे की टक्कर पाहावयास मिळण्याची चिन्हे आहेत.
सरपंचपदासाठी तालुक्यात वडाळ्यासह कांगोणी, अंमळनेर, हंडीनिमगाव येथे दुरंगी, माळी चिंचोरे, भेंडा बुद्रुक येथे तिरंगी, तर माका येथे सर्वाधिक पाच, अशी लढत होत आहे. या सात गावांमध्ये रॅली, चौकसभा, होम टू होम प्रचाराने निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत खरी रणधुमाळी पाहायला मिळते ती, वडाळा बहिरोबा येथे. या ग्रामपंचायतीत मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे व अ‍ॅड. चांगदेव मोटे यांच्या नेतृत्वाखालील गटाची सत्ता आहे. त्यांच्या गटाच्या विद्यमान सरपंच मीनल मोटे सलग दुसर्‍यांदा थेट जनतेतून सरपंचपदासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. या गटाचे यापूर्वीचे विरोधक माजी सरपंच दिलीप मोटे यांनी यंदा सत्ताधार्‍यांशी जुळवून घेतल्यामुळे सत्ताधार्‍यांचे पारडे जड झाल्याचे बोलले जातेय. मात्र, माजी उपसरपंच बाबासाहेब मोटे यांनी विरोधी मंडळाची सूत्रे हातात घेऊन भक्कम मोट बांधत सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार देऊन सत्ताधार्‍यांसमोर आव्हान उभे केले.

सत्ताधार्‍यांच्या गोटातील युवा नेतृत्त्व ललित मोटे यांना सरपंचपदाची त्यांच्याच विरोधात उमेदवारी देऊन त्यांनी त्यांची चांगलीच गोची केल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जवळपास सर्वच जागांवर तुल्यबळ उमेदवार दिल्याने या निवडणुकीत सुरुवातीपासून रंगत वाढली आहे. उमेदवारी माघारीची मुदत बुधवारी (दि. 14) संपल्यानंतर सत्ताधारी क्रांतीकारी शेतकरी पारदर्शक ग्रामविकास मंडळाने मोठे शक्तीप्रदर्शन करत नारळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ केला. यानंतर विरोधी परिवर्तन ग्रामविकास मंडळाने लगेच त्यांच्या तोडीस तोड शक्तीप्रदर्शन करत प्रचाराचा प्रारंभ केला.

प्रचार दरम्यान, क्रांतीकारी शेतकरी पारदर्शक ग्रामविकास मंडळाने गेल्या पाच वर्षात वडाळा बहिरोबा गावात केलेली सुमारे 12 ते 13 कोटी रुपयांची विकासकामे. त्यात राष्ट्रीय पेजजल योजना, संपूर्ण रस्ते काँक्रिटीकरण, भुयारी गटारे, स्मशानभूमी व त्यास ऑलकंपाउंड, पशु वैद्यकीय रुग्णालय, गावात पेव्हरब्लॉक, वृक्षारोपण, बाजारतळ ओटे, ओपन जिम, अशी विकासकामांसह गेल्यावर्षी वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीला तालुक्यात स्वच्छता अभियान अंतर्गत दहा लाखाचा प्रथम क्रमांकाचा मिळालेला पुरस्कार, असे विकासाचे मुद्दे पुढे आणले आहे.  विरोधी परिवर्तन ग्रामविकास मंडळाकडून गेल्या पाच वर्षांत निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. नगर-औरंगाबाद महामार्गालगतचे गाव असताना नियोजनाच्या अभावामुळे गावाला अवकळा आली.

गावाचा संपूर्ण नियोजनबद्ध कायापालट करण्यासाठी सत्तापालट करणे गरजेचे असून, मतदारांनी संधी दिल्यास आगामी पाच वर्षात वडाळा बहिरोबा गावाला मॉडेल व्हिलेज बनविण्याचे परिवर्तन ग्रामविकास मंडळाचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे सांगत आले. सत्ताधार्‍यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची, तर विरोधकांचे आक्रमण थोपविण्यात यशस्वी होतात की, विरोधक सत्तेचा गड सर करण्यात यशस्वी होतात, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

वैयक्तिक भेटीगाठींवर भर

दोन्ही मंडळांनी प्रचारात सुरुवातीपासून मोठी आघाडी घेतली असून, घरोघर जाऊन वैयक्तिक भेटीगाठींवर त्यांनी भर दिला आहे. प्रचारानिमित्ताने वडाळा बहिरोबा परिसर ढवळून निघाला असून, जेवणावळीची येथे प्रचंड रेलचेल सुरू असल्याचे सांगण्यात आले. पाच वर्षांत गावातील रस्ते, पाणी आदी विकासकामांच्या नावाने सत्ताधारी मतांचा जोगवा मागत आहेत, तर विरोधी मंडळाकडून त्यांचा हा दावा प्रखरपणे खोडण्यात येत आहे.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर
सोशल मीडियाचा प्रभावी वापर, यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य मानावे लागेल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सत्ताधारी व विरोधी मंडळाच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियाचा वॉर सुरू झाल्याचे दिसून आले. डिजिटल पोस्टचा पाऊस प्रचंड प्रमाणावर पडू लागल्याने मोबाईल हॅण्डसेटच्या साठवण क्षमतेवर त्याचा परिणाम होऊन मतदारही हैराण झालेत. मोठमोठे फ्लेक्स बोर्ड लावण्याची दोन्ही मंडळात स्पर्धा लागली आहे.

Back to top button