श्रीरामपूर : कोरोना अनुदानाचे संकेतस्थळ अखेर सुरू | पुढारी

श्रीरामपूर : कोरोना अनुदानाचे संकेतस्थळ अखेर सुरू

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या महासंकटात बळी पडलेल्या कोरोना मृतांच्या वारसांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरणासाठी सुरू करण्यात आलेले संकेतस्थळ दोन महिन्यांच्या खंडानंतर अखेर पुन्हा सुरू झाले आहे.  महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे पदाधिकारी व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी हे पोर्टल गेल्या दोन महिन्यांपासून बंद झाल्यामुळे राज्यातील कोरोना मृतांची ससेहोलपट होत असल्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालयापर्यंत विविध पातळ्यांवर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी प्रिया खान, मदत व पुनर्वसन विभागाचे अवर सचिव संजय धारूरकर यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा देखील केला होता. त्यानंतर मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासोबत मिलिंदकुमार साळवे यांची कोरोना एकल महिलांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विस्तृत बैठक झाली.

या बैठकीत देखील साळवे यांनी राज्यातील कोरोना मृतांच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेले राज्य सरकारचे संकेतस्थळ दोन महिन्यांपासून बंद असल्याकडे लक्ष वेधले होते. यावेळी झालेल्या चर्चेची व दिलेल्या निवेदनांची तत्काळ गंभीर दखल घेत डॉ. श्रीकर परदेशी यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दोन महिन्यांपासून बंद असलेले कोरोना सानुग्रह अनुदान वितरणाचे संकेतस्थळ दोन दिवसात सुरू करण्याचे आदेश दिले होते. हे संकेतस्थळ ऑनलाइन पद्धतीने सुरळीत करता येत नसेल, तर कोरोना अनुदान प्रक्रियेचे कामकाज ऑफलाईन पद्धतीने तातडीने सुरू करून गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना मृतांच्या वारसांची होणारी ससेहोलपट व हेळसांड थांबविण्याचे आदेश मदत व पुनर्वसन विभागाच्या मंत्रालयातील अधिकार्‍यांना दिले होते.

इतर जिल्ह्यात अडचणी सुरूच

काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील संगणक मंत्रालयातील संगणकाशी जोडले गेल्यानंतर आपोआप लॉग आऊट होत असल्याच्या व इतर काही समस्या उद्भवत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत मंत्रालयाशी संपर्क साधला असता माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने हे संकेतस्थळ पूर्वीप्रमाणे सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button