नगर : भावकी अन् नात्यागोतील लढतीने गावोगावच्या निवडणुकीत रंगत | पुढारी

नगर : भावकी अन् नात्यागोतील लढतीने गावोगावच्या निवडणुकीत रंगत

वाळकी (नगर ): पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता, 26 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराने शेवटच्या टप्यात गावोगावी चांगलाच राजकीय धुरळा उडाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही गटाकडून भावकी व नात्यागोत्यात राजकीय लढती लावल्याने गावातील राजकीय वातावरणात रंगत भरली आहे. मतदानासाठी अवघे दोन दिवस राहिल्याने निवडणुतील प्रचार शिगेला पोहचला असून, सत्तेसाठी उमेदवारांकडून युक्त्या व नवनवीन शक्लल लढविली जात आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भावी गाव कारभार्‍यांकडून दिलेल्या ओल्या पार्ट्यांमुळे परिसरातील हॉटेल्स, ढाबे हाऊसफुल झाले आहे, तर कार्यकर्ते झिंगाट झाल्याचे पहायला मिळत आहे.

गावचा कारभार आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी अनेक दिग्गज कारभारींनी आपली ताकत पणाला लावली. अनेक गावात भावाभावात, जावाजावात, नात्यागोत्यात अन् सासू-सुनेत दोन्ही गटांकडून राजकीय लढती लावल्या गेल्या आहेत. घराघरात अन् नात्यागोत्यात जुंपलेल्या लढतीत कोण जिंकत अन् कोण हरतं, याचीच चर्चा रंगताना दिसत आहे. सत्तेसाठी अनेक वर्षाचा राजकीय संघर्ष बाजुला ठेवून दुसर्‍याला धडा शिकविण्यासाठी गाव कारभारी एकत्र आल्याचे अनेक गावात दिसून आले. निवडणूक होणार्‍या गावांमध्ये एकमेकांविरोधात लढणार्‍या दोन्ही गटांच्या प्रचारांचे नारळ फुटले असून, वैयक्तिक पातळीपासून ते पॅनल पातळीपर्यंत जो-तो आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी धावाधाव करताना दिसतोय.

ग्रामपंचायतींचा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असल्याने मतदारांच्या भेटीसाठी उमेदवार शेताच्या बांधावर पोहचले, तर मजुर असलेल्या मतदारांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी मतदार, जिथे मजुरी करत असेल, तिथे उमेदवार पोहचत असून, आपल्याच मतदान करण्याची गळ घालत आहेत. गावपातळीवर जोरदार प्रचार सुरू झाला असून, मतदार राजाला खुश करण्यासाठी ओल्या पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत. त्यामुळे महामार्गावरील हॉटेल, ढाबे हाऊसफुल्ल झाले आहेत. कार्यकर्ते मात्र झिंगाट असल्याचे चित्र आहे. नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक आता चांगलीच रंगात आली असून, निवडणूक प्रचाराने गावोगावी राजकीय वातावरण तापले आहे. प्रत्येक गावातील चौकाचौकातून, पारावरती चर्चेचे फड रंगलेले दिसत आहेत.

उमेदवारांकडून दिवसा प्रचार करताना गाव विकासाच्या मुद्द्यावर बोलले जात आहे. तर, रात्री वैयक्तीक भेटीगाठी घेऊन मतांची गोळा बेरीज केली जात आहे. गावगाड्यातील बेरजेच्या राजकारणात गावकी, मित्र, नातेवाईक आदींची चाचपणी केली जात आहे. अतिशय कुशलतेने मतदार राजाला हाताळले जात असून, गावपातळीवर होणार्‍या या निवडणूका रंगतदार होणार यात शंका नाही.

वाळकीत प्रचाराचा नारळ फुटलाच नाही !

तालुक्याच्या राजकाणात महत्त्वाची अन् सर्वात मोठी असलेल्या वाळकी ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. वाळकीतील निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची चिन्ह आहेत. निवडणुकीतील दोन्ही गट प्रबळ असून, सरपंचपदासाठी दोन्ही गटाचे मातब्बर उमेदवार एकमेकांविरोधात उतरले आहेत. प्रत्येक निवडणुकीत नारळ फोडून प्रचारास प्रारंभ करण्याची परंपरा आहे. यावेळी मात्र दोन्ही गटाकडून ‘त्यांचा’ नारळ फोडल्या नंतर आपला नारळ, असे धोरण आखले आहे. आधी ‘त्यांचे’ शक्ती प्रदर्शन पाहू मग आपले दाखवू,’ या कारणामुळे दोन्ही गटाकडून नारळ फोडल्या विनाच प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्यात पोहोचली.

सोशल मीडियाचा हटके वापर

मतदारांना प्रत्यक्ष भेटीगाठी देण्याबरोबर निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचाही प्रभावी वापर होत आहे. यासाठी निवडणुकीपुरते व्हॉट्सऍप ग्रुप तयार केले असून, यामध्ये उमेदवारांकडून अतिशय चाणाक्ष पद्धतीने वापर केला जात आहे. प्रचाराचे व्हीडीओ सोशल मीडियावर अपलोड करून गावात आपलीच हवा असल्याचे दाखवत प्रचाराचा धुराळा उडवतायेत.

उमेदवारांची संभ्रमावस्था

गावागावात दोन्ही गटांकडून मतदारांना खुश करण्यासाठी ओल्या पार्ट्यांचा बेत आखला जातोय. वाडी वस्त्यांवर, तसेच ढाबे, हॉटेल वरील दोन्ही गटांच्या पार्टीसाठी मतदार हजेरी लावत आहेत. त्यामुळे मतदार नेमके कुणाचे याबाबत उमेदवारांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली. निवडणूक दोन दिवसाची असून, आपल्याला गावात वावरायचयं! कोणत्याही गटाचा समर्थक हा ‘शिक्का’ आपल्यावर नको. त्यामुळे दोन्ही गटाशी चांगले संबंध राखण्यासाठी मतदारांचा प्रयत्न आहे. ‘तुम्ही काहीच काळजी करू नका,’ असे दोन्ही गटांना मतदार सांगत असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था वाढली.

Back to top button