श्रीगोंदा : विहिरीत अडकलेल्या बिबट्याची दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका | पुढारी

श्रीगोंदा : विहिरीत अडकलेल्या बिबट्याची दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका

श्रीगोंदा : पुढारी ऑनलाइन वृत्तसेवा : कोसगव्हाण येथे पहाटेच्या दरम्यान विहिरीत पडलेल्या बिबट्याला दोन तासांच्या प्रयत्नानंतर वर काढण्यात वनविभागाला यश आले.  सोपान देशमुख व त्यांच्या पत्नी पुष्पा देशमुख  गव्हाला पाणी देत होते. पहाटे दोनच्या दरम्यान बाजूच्या शेतातून काहीतरी येत असल्याचा आवाज सोपान देशमुख यांना आल्याने त्यांनी हातातील विजेरी( बॅटरी) त्या दिशेने चमकवली असता त्यांना बिबट्या दिसला. पण विजेरीचा प्रकाश डोळ्यावर पडताच बिबट्याने तेथून धूम ठोकली. तो थेट विहिरीत जाऊन पडला. बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच उपसरपंच भीमराव नलगे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली.

वनविभागाचे अधिकारी आणि पथक पिंजरा घेऊन पहाटे पाचच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने पिंजरा विहिरीत सोडून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून बिबट्याला जंगलात  मुक्त करण्यात येणार आहे. यावेळी  उपसरपंच भीमराव नलगे,हर्षवर्धन नलगे, युवराज शिंदे, दिगंबर शिंदे, ज्ञानदेव चव्हाण, हरिभाऊ नलगे, संदीप पुजारी, कैलास मते,अप्पा रोडे,मारुती भांडवलकर, मिनीनाथ भोईटे, सुरेश गरड यांनी वनविभागाच्या पथकास मदत केली.

Back to top button