वाळकी : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जेवणावळी

वाळकी : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जेवणावळी
Published on
Updated on

वाळकी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : वाळकी गटातील सात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. गुलाबी थंडीतही ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकीय वातावरण तापले आहे. मतदारांना रोजच जेवण देऊन खूश केले जात आहे. दोन्ही गटांतील जेवणावळींसाठी मतदार हजेरी लावत असल्याने नेमके मतदार आपल्याकडे आहेत की दुसरीकडे याबाबत उमेदवारांत संभ्रम वाढला आहे . वाळकीसह गटातील दहिगाव, साकत खुर्द, वडगाव तांदळी, राळेगण म्हसोबा, बाबुर्डी बेंद, सारोळा कासार या गावांमध्ये सध्या कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण चांगलेच गरमागरम झाले आहे.

वाळकी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस वाढली आहे. तालुक्याच्या राजकारणात आपला ठसा उमठविणार्‍या नेत्यांची मोठी यादी आहे. माजी उपसभापती रंगनाथ निमसे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, धर्मराज शैक्षणिक संस्थेचे संस्थापक एन. डी. कासार, सचिव विक्रम कासार, शिवसेनेचे अप्पासाहेब भालसिंग, महादेव कासार यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्रित येत भाऊसाहेब बोठे यांच्या विरोधात राजकीय आखाड्यात आव्हान उभे केले आहे.

सदस्यपदाच्या 17 जागांसाठी 36 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सरपंचपदासाठी तिरंगी लढतीने निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे. माजी सभापती रंगनाथ निमसे, शरद बोठे, रामदास भालसिंग यांच्यात सरपंचपदासाठी राजकीय कुस्ती रंगणार आहे. वाळकी ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे .
दहिगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गटांत सरळ लढत रंगणार आहे. सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 19 उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.

यात पाच अपक्ष सदस्यपदासाठी आपले नशीब आजमावत आहेत. तर सरपंचपदासाठी पंचरंगी लढत होणार आहे. सरपंचपदासाठी सुरेखा मधुकर म्हस्के, अनामिका पोपट म्हस्के, छाया माणिक म्हस्के, मीरा कचरू गायकवाड, मिनाज मुनिर शेख निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. मागील पंधरा वर्षापासून मधुकर म्हस्के यांचे ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. म्हस्के यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक जयवंत शिंदे यांनी पॅनेल उभा केला आहे. एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणारे मधुकर म्हस्के व जयवंत शिंदे यांनी यावेळी एकमेकांविरोधात राजकीय मैदानात दंड थोपटले आहेत .

वडगाव तांदळी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी चुरसीची लढत होणार आहे. सदस्य पदाच्या 9 जागा असून यात सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. सदस्य पदाच्या दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणूक लढवत आहेत. खरेदी-विक्री संघाचे संचालक अनिल ठोंबरे व चेअरमन रावसाहेब रणसिंग यांनी वीस वर्षाचे राजकीय वैर बाजूला ठेवून एकत्रित आले आहेत. ठोंबरे, रणसिंग यांच्या विरोधात गहिनीनाथ पिंपळे यांनी आव्हान उभे केले आहे. सरपंचपदासाठी कल्पना पिंपळे व इंदुबाई रणसिंग यांच्यात राजकीय सामना रंगणार आहे.

सारोळा कासार ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदाच्या 11 जागांसाठी 24 उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. मागील दहा वर्षापासून ग्रामपंचायतवर पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र कडूस यांचे वर्चस्व आहे. यावेळी त्यांच्या वर्चस्वाला खालसा करण्यासाठी संजय काळे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन संजय धामणे , तालुका दूध संघाचे चेअरमन गोरख काळे, जयप्रकाश पाटील यांनी एकत्र येत आपले उमेदवार उभे केले आहेत. रवींद्र कडूस गटासमोर विरोधकांनी मोठे आव्हान उभे केले आहे. सरपंचपदासाठी सुजाता काळे, आरती कडूस, मंगल कडूस यांच्यात सामना रंगणार आहे. सारोळा कासार ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राळेगण म्हसोबा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी तिरंगी लढत होणार आहे. सदस्य पदाच्या 11 जागांसाठी 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ग्रामपंचायतवा सुधीर भापकर यांचे वर्चस्व आहे. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे सर्मथक सुधीर भापकर व महाविकास आघाडीचे शरद कोतकर यांच्या गटात समोरासमोर लढत होईल. सरपंच पदासाठी दीपाली सुधीर भापकर , मनीषा भरत हराळ , आकांशा संतोष शेलार यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे . सरपंच पदी कोण बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे .

बाबुर्डी बेंद ग्रामपंचायत निवडणुकीत बाजार समितीचे माजी उपसभापती रेवणनाथ चोभे व सुनील खेंगट यांच्यात राजकीय वर्चस्वासाठी सामना रंगणार आहे . सदस्य पदाच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सरपंच पदासाठी रेश्मा रेवणनाथ चोभे आणि मंदा सुनील खेंगट चांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे . रेवणनाथ चोभे, दिलीप चोभे, काशीनाथ चोभे या निवडणूकीत एकत्र आले आहेत .

साकतच्या सरपंच पदासाठी तिरंगी लढत होत आहे, तर ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. सरपंच पदासाठी वसंत बोचरे, नंदू पवार, दत्तात्रय वाघमोडे याच्यात सामना होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news