

पारनेर / जवळा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील निघोज येथील बबन कवाद यास अहमदनगर व पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, त्याचा जामीन रद्द करण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस व न्यायमूर्ती सुधांषू धुलिया यांच्या पीठाने हे आदेश दिले. याबाबत अधिक माहिती अशी, निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्या खून प्रकरणातील कटात सहभाग असल्याचा बबन कवादवर आरोप आहे. यापूर्वी या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने कवादला निघोज गावात जाण्यास बंदी घालत जामीन मंजूर केला होता. असे असतानाही कवाद याने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात कुकडी पाणी प्रश्नासाठी निघोजमध्ये जाऊन उपोषण केले होते.
त्यामुळे न्यायालयाच्या अटींचा भंग झाला होता. म्हणून संदीप वराळ खून प्रकरणातील फिर्यादी रंगनाथ वराळ यांनी कवादचा जामीन रद्द करण्याची मागणी औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती. खंडपीठाने कवाद याची जामीन रद्द केला होता. त्यानंतर, या आदेशाला कवादने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून फिर्यादीची जामीन रद्दची मागणी फेटाळून लावली. मात्र, कवाद याला नगर व पुणे जिल्ह्यात संदीप वराळ खून खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रवेश करण्याला बंदी घातली आहे.
आरोपीच्या वकिलांनी या प्रकरणात आरोपी वर्षभर बंदीवान होता, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे ही बंदी फक्त या खटल्याच्या न्यायालयीन कामाजासाठी अपवाद राहील, असेही न्यायालयाने म्हटले आहे. कवाद याचा जामीन रद्द करण्याची मागणी राज्य सरकारनेही केली होती. कवाद याच्या वतीने अॅड.सुधांषू चौधरी यांनी बाजू मांडली.