नगर : धुके,ढग शेतपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव !

नगर : धुके,ढग शेतपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव !

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यात धुके आणि ढगाळ वातावरण तयार झाल्याने सर्वच पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांच्या फवारणीमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यात अतिवृष्टीने खरीप पिकांची वाताहत झाली होती. तसेच, कांद्याची रोपे वाया गेल्याने कांदा क्षेत्रात घट होऊन, ज्वारी व गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कांदा, गहू, हरभरा, चारा पिके जोमात असतानाच वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

सद्यस्थितीत रब्बी हंगामासाठी तालुक्यात साठ हजार क्षेत्र लागवडीखाली आले आहे. त्यामध्ये ज्वारी 23 हजार हेक्टर, गहू तीन हजार हेक्टर, कांद्याची लागवड 13 हजार हेक्टर, तर हरभरा दहा हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्यात आला आहे. चालू वर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

वातावरणातील बदलामुळे कांदा पिकावर करपा, डाऊनी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, तसेच कांदा सडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गव्हाच्या पिकावर तांबेरा व मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. हरभरा पिकावर मावा, मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच, सर्वच पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. अशा वातावरणात पाऊस झाल्यास जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.

खरीप पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच रब्बी पिकांसाठी शेतीची मशागत, पेरणी, कांदा लागवड यासाठी शेतकर्‍यांनी मोठा खर्च केला आहे. सर्वच पिके जोमदार असताना वातावरणात झालेल्या बदलाने संपूर्णता आर्थिक गणितच कोलमडून गेले आहे. धुके, ढगाळ वातावरण त्यातच सकाळी पडत असलेले दव हे पिकांसाठी घातक असून, महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार आहे. रब्बी पिकांना हमीभाव मिळाला नाही, तर पुन्हा शेतकरी आर्थिक तोट्यात जाणार आहे.

वातावरण पिकांसाठी घातक

चालू वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची वाताहात झाल्याने पदरी काहीच पडले नाही. रब्बी हंगामात कांदा, गहू पिकांसाठी मोठा खर्च करण्यात आला. परंतु सद्यस्थितीत तयार झालेले वातावरण पिकांसाठी घातक असून, महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. तरीही उत्पन्नात घट होणार आहे. अतिवृष्टीचे पंचनामे झाले, पण अद्यापि मदत न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, असे जेऊर येथील शेतकरी नितीन पाटोळे यांनी सांगितले.

खराब हवामानाने सर्वच पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकर्‍यांनी वेळोवेळी बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी. पावसाचा अंदाज घेऊन पाण्याचे व्यवस्थापन करावे. कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात यावा.
– संदीप काळे,  कृषी सल्लागार, साईनाथ उद्योग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news