राहुरीतील बंदला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राहुरीतील बंदला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on
Updated on

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ व भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांनी बंद पुकारला होता. या बंदला राहुरी शहरातील सर्व छोटे व्यापारी मोठे व्यापार्यांसह सर्व नागरिकांनी सहभागी होत बंद पाळला.

महाराष्ट्र सरकार मधील शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करून समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखवल्या आहे. याच्या निषेधार्थ व चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करणारे भीमसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्‍या राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यावर कारवाई व्हावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

बंदप्रसंगी राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेत निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संविधान बचाव संघर्ष समितीचे कांतीलाल जगधने, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय संसारे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल, भीम आर्मी महिला आघाडीच्या मुन्नाताई चावरे, अनिताताई म्हस्के, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जालिंदर घिगे, समता परिषदेचे प्रशांत शिंदे, लहुजी शक्ती सेनेचे ज्ञानेश्वर जगधने, रिपब्लिकन युवा सेनेचे चंद्रकांत जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुंड, रिपाई आंबेडकर गटाचे तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे आदींनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यानंतर राज्यपाल कोशारी व चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, श्याम जाधव, साहिल जाधव, अक्षय भालेराव, अमोल भालेराव, युवराज पारडे, जगदीश भालेराव, दत्ता जोगदंड, महेश साळवे, अशोक तुपे, हरिदास जाधव, विजय पवार, प्रशांत लहारे यांसह अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली काल सकाळी अकरा वाजता राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गावर बस स्थानक समोर जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विलास साळवे, आरपीआय महिला तालूकाध्यक्षा स्नेहल सांगळे, अनुसंगम शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध व्यक्त केला.
या प्रसंगी काही कार्यकर्तांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस पथकाने तात्काळ झडप घालून पुतळे ताब्यात घेऊन कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत गर्दीला पांगविण्यात आले.

कार्यकर्ते व पोलिसांमध्ये धावपळ

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषां बद्दल बेताल वक्तव्य करणारे भगत सिंग कोश्यारी व चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे आज दहन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरपीआय च्या कार्यकर्त्यांना पोलिस पथकाने धक्काबूक्की करून पुतळे जप्त केले. त्यामुळे काही काळ कार्यकर्ते व पोलिस पथकाची धावपळ होऊन दहशत निर्माण झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news