राहुरी : ग्रामपंचायतीची लढत न्यारी, करू पुढची तयारी !

राहुरी : ग्रामपंचायतीची लढत न्यारी, करू पुढची तयारी !

रियाज देशमुख : 

राहुरी :  राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. आ. प्राजक्त तनपुरे, खा. डॉ. सुजय विखे पा. व माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी विशेष लक्ष देत जास्तीत- जास्त कार्यकर्ते ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कसे होतील, याकडे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे, परंतु गाव पुढार्‍यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे मोर्चा पुढे केल्याचे चित्र दिसत आहे. आरडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ग्रामविकास, सत्ताधारी जनसेवा व महादेव जैतोबा वंचित आघाडी असे 3 पॅनल एकमेकांना शह देण्यास जय्यत तयारी करीत आहेत. विखे-कर्डिले विरोधात तनपुरे अशी सरळ लढत असतानाच वंचित बहुजन आघाडीने उडी घेतल्याने मोठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. 'वंचित'चे अनेक मोहरे बाहेर पडल्याने तिसरा पॅनल अपुरा ठरत आहे. त्यांच्या नाराज गटाचा लाभ घेण्यासाठी प्रस्थापित दोन्ही पॅनलने ताकद लावण्यास प्रारंभ केला आहे.

राष्ट्रवादीकडून सुनील मोरे, सुरेश झुगे, पोपट झुगे, कैलास झुगे हे प्रयत्नशील असताना विरोधी कर्डिले-विखे पॅनलचे तनपुरे कारखाना संचालक रविंद्र म्हसे, शिवाजी वने, अशोक काळे हे लढत देत आहेत. 'वंचित'कडून अनिल जाधव, अनिल भारती व नितीन काळे यांनी रंगत आणली आहे. सोनगाव ग्रामपंचायतीमध्ये दोन्ही विखे प्रणित पॅनल एकमेकांविरोधात लढत आहेत. लोकनियुक्त सरपंच व 11 सदस्य निवडीसाठी सोनगाव गावामध्ये रणांगण पेटले आहे. दोन्ही गटांना बिनविरोध सदस्य पद मिळाले आहे. यासह प्रवरा पट्ट्यातील कोल्हार खुर्दच्या ग्रामपंचायत निवडणुकीतही चांगलीच रंगत आली आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी 5 जण उमेदवार तैनात आहेत. दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असून, तेथेही दोन्ही पॅनल विखे प्रणित आहेत.

खडांबे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये लोकनिुयक्त सरपंच पदासाठी 3 उमेदवार उभे आहेत. जनसेवा व विकास मंडळामध्ये 'वंचित'ने उडी घेतल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. जनसेवा मंडळाचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लटके, माजी सरपंच शामराव खेसमाळसकर तर विकास मंडळाचे नेतृत्व कानिफनाथ कल्हापूरे, प्रभाकर हरिश्चंद्रे हे करीत आहेत. 11 सदस्य व लोकनियुक्त सरपंच निवडीसाठी खडांबेमध्ये रणसंग्राम पेटला आहे.
काेंंढवड ग्रामपंचायतीमध्ये 2 पॅनल समोरासमारे लढत देत आहेत. अर्जुन म्हसे, मधुकर रामदास म्हसे हे दोन्ही पॅनलकडून आहेत तर अपक्ष म्हणून मधुकर बाबासाहेब म्हसे हे तीघे सरपंच पदासाठी लढा देत आहेत.

तुळापूर ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढत रंगली आहे. विखे गटविरोधात तनुपरे गट अशी सरळ लढत आहे. राष्ट्रवादीच्या ओबीसी महिला उमेदवाराला बिनविरेाध सदस्याची संधी मिळाली आहे. माजी आ. शिवाजी कर्डिले गटाचे सदस्य दोन्ही पॅनलकडे विभागले आहेत. तुळापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार दादा रावसाहेब हारदे व दादा सोपान हारदे या दोघांच्या नावात साम्य असल्याने मतदार संम्रभावस्थेत असणार, अशी चर्चा गावात होत आहे.

मांजरी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दुरंगी लढत होत आहे. आण्णासाहेब भिकाजी विटनोर व विठ्ठल तबाजी विटनोर या चुलते-पुतण्याच्या गटामध्ये सरळ लढत होत आहे. दोन्ही गट राष्ट्रवादीचे असून, दोन्हीकडे विखे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाठबळ दिले आहे. लोकनियुक्त पदासाठी 2 पॅनलच्या उमेदवारांना अपक्षाने धोक्याचा ईशारा दिला आहे. 11 सदस्य निवडीसाठी व लोकनिुयक्त सरपंच पदासाठी मांजरी गावामध्ये ग्रामपंचायतची रंगत वाढली आहे. संत महिपती महाराज यांच्या पावनभूमीमध्ये लोकनियुक्त सरपंच पदासाठी 2 पॅनलकडून तर एक अपक्ष उमेदवार एकमेकांना लढत देत आहे.

येथे राष्ट्रवादी विरोधात भाजप अशी सरळ लढत आहेत. तनपुरे व कर्डिले गटामध्ये ताहाराबादमध्ये चांगलीच रंगत आली आहे. यापूर्वी विखे- कर्डिले गटाची सत्ता होती. परिवर्तनाची हाक देत राष्ट्रवादीने प्रचार सुरू केला आहे. सत्ता राखण्याचे भाजपकडून शर्थीचे प्रयत्न होत आहेत. गाडकवाडीमध्ये राष्ट्रवादीच्या 2 जागा बिनविरोध निवडून आल्या. 9 सदस्य तसेच लोकनियुक्त सरपंच अशा 10 जागांसाठी आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

मानोरी गावामध्ये प्रतिस्पर्धी असलेले भाजप- राष्ट्रवादी गटाने एकी करीत मागिल सत्ता काळातील अपक्ष लोकनिुयक्त सरंपच आब्बासभाई दयावान यांच्या गटाविरोधात हातमिळवणी केली, परंतु तिकीट वाटपात मातब्बरांना डावलल्याने त्याचा लाभ घेण्यास दयावान यांचे पॅनल अग्रेसर आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी 4 उमेदवार असताना मानोरीत आरपारची लढाई चर्चेची ठरत आहे. ब्राम्हणगावमध्ये लोकनियुक्त सरपंच बिनविरोध झाल्याने निवडणुकीचा रंग फिका पडला. केंदळ खुर्दमध्ये 9 सदस्य बिनविरोध झाल्यानंतर लोकनियुक्त सरपंचासाठी दोन्ही उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या थांब्याची चर्चा

प्रवरा पट्ट्यातील गावांमध्ये विखे गटातील दोन्ही पॅनलमध्ये सरळ लढती होत असताना तनपुरे गटाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थांबा घेत निवडणुकीतून माघार घेतली. सोनगाव, कोल्हार खुर्दमध्ये राष्ट्रवादीची चुप्पी तर मानोरीत विखे-कर्डिले गटाला दिलेला पाठिंबा राहुरी हद्दीत चर्चेत आहे. लढणार्‍यांपेक्षा थांबा घेणार्‍यांची चर्चा पारावर बैठकीत होत आहे.

निवडणूक काळातच आपण विभक्त

मांजरीत चुलते- पुतण्याची लढाई चांगलीच रंगली आहे. आरोप- प्रत्यारोप होताना गाव नातेवाईक आहे. त्यामुळे 'निवडणुकीपुरतेच विरोधक नंतर नातलग,' असे सांगत उमेदवारांचा प्रचार रंगत आहे. मांजरीत नात्यागोत्यांतील एकी तर दुसरीकडे राजकीय बेकीची चर्चा रंगत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news