चोरीचा मुद्देमाल केला हस्तगत ; नगर तालुका पोलिस ठाण्याची कामगिरी | पुढारी

चोरीचा मुद्देमाल केला हस्तगत ; नगर तालुका पोलिस ठाण्याची कामगिरी

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील कामरगाव येथील श्यामराव इंद्राजी आंधळे यांच्या घरी तीन महिन्यांपूर्वी दिवसा चोरी झाली होती. या चोरीतील मुद्देमाल नगर तालुक्याच्या पोलिसांनी हस्तगत केला आहे. हा संपूर्ण मद्देमाल त्यांना परत करण्यात आला आहे.  या चोरीची नगर तालुका पोलिस ठाण्यात आंधळे यांनी फिर्याद दिली होती. दुपारी वेळ साधून टेहळणी करून चोरट्यांनी आंधळे यांच्या घरामागील दार तोडून पाच तोळ्यांच्या अंगठ्या, बोरमाळ, असे सुमारे दोन लाख 50 हजाराचे सोने व 50 हजार रुपये, असा एकूण तीन लाखांचा ऐवज चोरी झाला होता.

सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या सहकार्‍यांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन 11 दिवसांत बाणखेल (ता. आष्टी) येथील चोरांच्या टोळीचा शोध लावला. चोरी गेलेल्या वस्तू व रोख रक्कम चोरांकडून हस्तगत करण्यात आली असून, कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून न्यायालयाच्या आदेशानुसार श्यामराव आंधळे यांना परत केल्या आहेत. यावेळी खंडू बेरड, शिवबा संघटना जिल्हाध्यक्ष सचिन बाजीराव कोतकर, राजेंद्र पोटे आदी उपस्थित होते. अल्पावधीतच सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी चोरी गेलेला माल परत मिळवून दिल्याबद्दल कामरगाव येथील पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहायक पोलिस निरीक्षक सानप व त्यांच्या सहकार्‍यांचे विशेष अभिनंदन केले. वारंवार होणार्‍या चोर्‍या रोखण्यासाठी उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली.

Back to top button