कर्जत : प्रवीण घुले यांची आ. रोहित पवारांवर टीका | पुढारी

कर्जत : प्रवीण घुले यांची आ. रोहित पवारांवर टीका

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले मित्रमंडळाच्या वतीने काल संवाद बैठक घेण्यात आली. यावेळी कर्जत-जामखेड मतदार संघामधून त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी सर्वच वक्त्यांनी घुले यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगताना आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. या बैठकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, सरपंच अप्पासाहेब निकत, राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश तनपुरे, ओंकार तोटे, तानाजी पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेंद्र धांडे, श्रीराम गायकवाड, विजय मोरे, राजू बागवान, रणजित नलावडे, सुरेश खिस्ती, अमित नलगे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी घुले यांच्यासह त्यांच्या सर्व समर्थकांनी काँग्रेस सोडण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याची जाहीर केले. तसेच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच भव्य मेळावा घेऊन जाहीर प्रवेश करणार असल्याचे सांगितले. यावेळी घुले म्हणाले आपण काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होतो. आपल्याबरोबरच सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. पक्ष अडचणीत असताना पक्षाला तालुक्यात अनेक निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला. आमदार किंवा खासदारकीच्या निवडणुकीमध्यसुद्धा पक्षादेश पाळला. मात्र, पक्षाने आणि लोकप्रतिनिधींंनी माझ्यासह सर्वच कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास केला. माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले.

मी कार्यकर्त्यांसाठी असणारा नेता आहे. स्वाभिमानी कार्यकर्ता हेच माझे शक्तिस्थळ असून, त्यांच्याच सहकार्यातून विविध पदे उपभोगता आली. तसेच त्यांच्या विविध कामांसाठी पुढाकार घेत त्याची सोडवणूक करण्यात यश आले, याचे समाधान आहे. मी नेता नव्हे, तर कार्यकर्ता असून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी हीच माझी श्रीमंती आहे. एका हाक देताच जमलेल्या कार्यकर्त्यांमुळे मी भारावून गेलो आहे. यावेळी आदेश शेंडगे, कृष्णा लोखंडे, नजीर शेख, ओंकार गायकवाड, प्रशांत गायकवाड आदींची भाषणे झाली माजी सरपंच बाळासाहेब लोंढे यांनी प्रास्ताविक केले. सुरेश ख्रिस्ती यांनी आभार मानले.

Back to top button