भातकुडगाव : विदेशी ‘पाहुण्यांं’ची प्रतीक्षा ! निवारा नसल्याने फ्लेमिंगोंनी जायकवाडी अभयारण्याकडे फिरविली पाठ

भातकुडगाव : विदेशी ‘पाहुण्यांं’ची प्रतीक्षा !  निवारा नसल्याने फ्लेमिंगोंनी जायकवाडी अभयारण्याकडे फिरविली पाठ
Published on
Updated on

भातकुडगाव : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र तसेच देशाच्या इतर राज्यांबरोबर विदेशातील विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळख असणार्‍या दक्षिण काशी पैठणस्थित जायकवाडी पक्षी अभयारण्यास विदेशी पाहुण्या पक्ष्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. निवारा नसल्याने पक्ष्यांनी अभयारण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
गेल्या 3-4 वर्षांपासून धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने पक्ष्यांना भक्ष्य व निवारा मिळत नसल्याने पक्ष्यांनी अभयारण्याकडे पाठ फिरवली असल्याचे मत पक्षीमित्रामधून व्यक्त होत आहे.

परिणामी शेकडो देशी-विदेशी पक्ष्यांसह जायकवाडीला मुख्य आकर्षण असलेला येथील पक्षी अभयारण्याचा राजा असलेल्या बहुचर्चित फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्यांची प्रतीक्षा लागली आहे.  जायकवाडी जलाशयाकडे विदेशी पक्ष्यांचे आगमन हिवाळा ऋतूतील ऑक्टोबर ते मार्च या सहामाही काळात होते. अभयारण्याच्या विस्तीर्ण परिसरात त्यांचे वास्तव्य असते. धरणातील पाणथळ व दलदलीचा भाग पक्ष्यांना पोषक असतो. येथे पक्ष्यांचे भक्ष्य असलेले छोटे मासे, किडे, शैैवाल आदी मोठ्या प्रमाणात पैदास उपलब्ध असल्याने दिवसेंदिवस विदेशी पाहुण्या पक्ष्यांच्या संख्येत मोठी वाढ होत गेली.

जायकवाडी धरणात लाखोंच्या संख्येने असलेल्या या पक्ष्यांच्या थव्यांनी पक्षीमित्रांना भुरळ घातली आहे. दरवर्षी येथे पक्षी निरीक्षणासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. एक प्रकारे मोठा पक्षी महोत्सव साजरा होत असतो. मात्र, अलीकडच्या काळात जलाशय पूर्ण क्षमतेने भरत असल्याने आहार-विहार-निवार्‍याअभावी पक्षी पर्यटन स्थळ बदलून गेल्याने पक्षीमित्रांना या पक्ष्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे.

यंदा अजूनही जायकवाडी पक्षी अभयारण्याचे वैशिष्ट्य असलेला फ्लेमिंगो आढळला नाही. धरण पूर्ण भरल्यामुळे पाणथळ व दलदलीची जागा राहिली नाही. त्यामुळे थंडी पडली असतानाही पाहुण्या पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. मुख्यत्वे ल्गॉसी आयबिस (चिमना कंंकर), बार हेडेड गुज (राजहंस), स्पॉट बिल्ड डक (धनवर), कॉमन टेल (सुंदर बटवा), कॉमन कुट (चांदी), ब्लॅक विंग स्टिल्ट, पेन्टेड स्टॉर्क, व्हाईट आयबिस, ब्लॅक आयबिस हे पक्षी अजूनही आढळले नाहीत.
विदेशी पाहुण्या पक्ष्यांची वर्दळीमुळे अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या या अभयारण्यातील पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी विदेशी पक्षीमित्रांनी या काळात मुक्कामी वास्तव्य करून निरीक्षण केले.

विदेशी पक्ष्यांची रेलचेल व पर्यटकांचे माहेरघर बनलेल्या जायकवाडी धरणाच्या आतील बाजूला शासनाने पक्षी अभयारण्य म्हणून घोषितही केले आहे. मात्र, आता या अभयारण्याकडे विदेशी पक्ष्यांनी गेल्या 3-4 वर्षांपासून पाठ फिरविली आहे. यामुळे विदेशी पक्ष्यांची आतुरतेने वाट पाहणार्‍या पक्षीमित्रांचा हिरमोड होत असून, बदललेल्या पर्यावरण समीकरणामुळे पक्षी मित्रांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच, पक्षी निरीक्षणाचा आनंद हिरावला जात असल्याने निराशा आहे. दरम्यान, स्पुनबिल (चमचा), रुडी शेलडक(राजहंस), गोल्डन डक (चक्रवाक) आदी स्थलांतरित पक्ष्यांचे अपवादात्मक एखादा अर्धा थवा सध्या जलाशयात पाहावयास मिळत आहे.

मुख्य आकर्षण असलेल्या फ्लेमिंगोचे जवळपास दोन ते चार महिने उशिराने थेट फेब्रुवारीत आगमन होते. त्यांचेही अत्यल्प प्रमाण राहत आहे. यामुळे पक्षी निरीक्षकांना व सर्वसामान्य पक्षीप्रेमी यांना सध्या तरी पाहुण्या पक्षांची प्रतिक्षाच आहे.
– सुनील पायघन,  पक्षीमित्र, पैठण

 

गेल्या 3-4 वर्षांपासून पक्षी स्थलांतरित होऊन येण्याची वेळ निश्चित राहिली नसल्याने आमच्या सारख्या पक्षीप्रेमींचा पक्षीनिरीक्षणात हिरमोड होत आहे. पैठण निवासी पाहुणे पक्षी न आल्याने चुकल्या-चुकल्यासारखे होत आहे.
– प्रा. संजय काळे, भाविनिमगाव, ता. शेवगाव.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news