नगर : सकल हिंदूंच्या मोर्चावर ड्रोनची नजर | पुढारी

नगर : सकल हिंदूंच्या मोर्चावर ड्रोनची नजर

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरात बुधवारी (दि.14) सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी मोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमिवर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, मंगळवारी पोलिस अधीक्षक यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करून बंदोबस्ताचा आढावा घेतला. तसेच मोर्चावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार असून सुमारे 42 जणांना 2 दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. मोर्चासाठी कालीचरण महाराज आणि काजल हिंदुस्थानी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

लव्ह जिहाद विरोधी व धर्मांतरविरोधी कायदा महाराष्ट्रासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने बुधवारी शहरातून मोर्चा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळीवाडा बसस्डँड येथून सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार असून, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पंचपीर चावडी, आशा टॉकिज, माणिकचौक, कापडबाजार, तेलीखुंट, चितळे रोडमार्गे दिल्लीगेट अशा पारंपरिक मिरवणूक मार्गावरुन मोर्चा निघणार आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठ्या पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून ड्रोनद्वारे सर्व हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे.

तगडा पोलिस बंदोबस्त
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अपर पोलिस अधीक्षक, दोन पोलिस उपअधीक्षक, अकरा पोलिस निरीक्षक, 43 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 380 पोलिस अंमलदार, दोन एसआरपी व दोन धडक शिग्रकृती दलाची पथके बंदोबस्तात राहणार आहेत.

Back to top button