श्रीगोंदा : ‘त्या’ तरुणाचा पैशाच्या वादातून खून; चार जणांना अटक | पुढारी

श्रीगोंदा : ‘त्या’ तरुणाचा पैशाच्या वादातून खून; चार जणांना अटक

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : हिरडगाव येथील तुषार अण्णासाहेब दरेकर या तरुणाचा पैशाच्या वादातून खून झाल्याचे समोर आले आहे. खून करणार्‍या चार आरोपींविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णा भाऊसाहेब ससाणे, परशुराम दादा गुणवरे, शिवाजी भास्कर दरेकर, सतीश रामदास दरेकर (सर्व रा.हिरडगाव) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीना अटक करून न्यायालयात हजर केले असता, पंधरा डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी राहुल दरेकर यांनी फिर्याद दिली आहे.

मयत तुषार हा आरोपी अण्णा ससाणे याच्यासोबत पोल उभारणीच्या कामासाठी जात होता. दि.9 डिसेंबर रोजी तो सकाळी घरातून कामासाठी बाहेर पडला. रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास तुषार यास जेवणासाठी फोन केला व कोठे आहे, घरी यायला किती वेळ आहे, असे विचारले. त्यावर त्याने सांगितले की, आज गुणाट (ता.शिरूर) येथे काम चालू होते. आता मी तसेच ठेकेदार अण्णा ससाणे, परशुराम गुणवरे, शिवाजी दरेकर, सतीष दरेकर असे सर्वजण वैष्णवी हॉटेल, काष्टी रोड, श्रीगोंदा येथे जेवणासाठी थांबलो आहे. थोड्या वेळात घरी येतो, असे सांगितले.

त्यानंतर साधारण रात्री 9 वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान आई आशाबाई हिला घराच्या बाजूला एक पिकअप गाडी आल्याचे दिसले. सदर पिकअप गाडी ठेकेदार अण्णा ससाणे याची असल्याने आशाबाई यांनी पुढे जाऊन पाहिले असता, या चौघा आरोपींनी पिकअपच्या मागील भागातून तुषार यास बाहेर काढून टाकत तेथून पलायन केले. आई आशाबाई यांना तुषार हा खाली जमीनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारापूर्वीच तो मयत झाला होता. मयत तुषार यास टणक वस्तूने मारहाण करून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मृतदेहाचे पुणे येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात मयत तुषार याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. पैशाच्या वादातून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या चौघा आरोपींविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करून, न्यायालयात हजर केले असता, पंधरा डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.

 

Back to top button