श्रीगोंदा : कुकडी, घोड कालव्याच्या पाण्याकडे डोळे; शेतीसाठी तातडीने पाणी सोडा | पुढारी

श्रीगोंदा : कुकडी, घोड कालव्याच्या पाण्याकडे डोळे; शेतीसाठी तातडीने पाणी सोडा

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिकांना आता पाण्याची आवश्यकता असून, यासाठी कुकडी अन् घोड कालव्याच्या पाण्याकडे शेतकरी आस लावून बसला आहे. परिसरातील शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे. कुकडी व घोड कालव्यातून शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे निवेदनाद्वारे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली.

म्हस्के यांनी निवेदनात म्हटले की, डिसेंबर महिन्याची 12 तारीख आली तरीही सल्लागार समितीची बैठक झाली नाही. तरी, तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात यावा. कारण, अतिवृष्टीमुळे पहिला हंगाम वायाला गेला आहे. शेतकर्‍यांनी शेतीची मशागत करून नव्याने पिके उभी केली आहेत. ती जगवण्यासाठी त्याला रात्रीचा दिवस करावा लागत आहे.

वीज वितरण कंपनीने वीज बिलाची रोहित्रे बंद करून खूप दिवस वसुली केली. आता, रोहित्रे चालू आहेत. परंतु, लाईट वेळेवर येत नाही. आली तरी ती कायमस्वरुपी राहत नाही. कायमस्वरुपी राहिली, तरी कमी दाब असल्याने वीजपंप चालत नाहीत, अशी परिस्थित असते. यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी अडचण निर्माण होते. शेतीला पाण्याची आवश्यकता आहे.

‘तातडीने निर्णय घ्यावा’
सध्याची उपलब्ध पाण्याची परिस्थिती पाहता, या हंगामामध्ये दोन व उन्हाळी हंगामामध्ये तीन पाणी मिळू शकतात. उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन आज रोटेशन सुरू झाल्यास डिसेंबरचे एक रोटेशन व फेब्रुवारी 2023मध्ये दुसरे रोटेशन व उन्हाळी हंगामात एक, असे तीन रोटेशन होऊ शकतात. याचा विचार करून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे पालकमंत्री विखे यांच्याकडे करण्यात आलेली आहेे.

शंभर टक्के भरलेली धरणे
आजच्या परिस्थितीनुसार येडगाव धरण : 97 टक्के, माणिक डोह : 90 टक्के, वडज : 97 टक्के, डिंबा : 100 टक्के, पिंपळगाव जोगे : 86 टक्के. सध्या तालुक्याचा सरासरी पाणीसाठा 94 टक्के इतका आहे.

Back to top button