नगर : झेडपीतील ‘वारे’ रोखले कोणी..? | पुढारी

नगर : झेडपीतील ‘वारे’ रोखले कोणी..?

नगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन वर्षांपासून पाणी पुरवठा विभागात ‘कार्यकारी अभियंता’ हे पद रिक्त आहे. या कालावधीत तब्बल सात अधिकार्‍यांनी प्रभारी काम केले. त्यानंतर कुठे नगरसाठी कार्यकारी अभियंता म्हणून एस.आर. वारे यांची पदोन्नतीवर बढती झाल्याचा आदेशही निघाला. मात्र, आता पंधरा दिवस उलटत आले तरीही ‘वारे’ अजुनही जिल्हा परिषदेत पद्भार घेण्यासाठी पोहचू शकलेले नाही. त्यामुळे याप्रकरणात नेमके गौडबंगाल काय? याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

नगर जिल्हा परिषद ही विस्ताराने राज्यात मोठी आहे. त्यामुळे येथील प्रशासनही तितकेच गतीमान गरजेचे आहे. असे असताना पाणी पुरवठा विभागाला कार्यकारी अभियंता नसल्याने येथे दोन वर्षांपासून प्रभारीराज सुरू आहे. सात उपअभियंत्यांनी या ठिकाणी ‘कार्यकारी अभियंत्यांं’ची खुर्ची सांभाळली आहे. याच कालावधीत जलजीवनसारखी महत्वकांक्षी योजनाही सुरू झाली. मात्र तरीही कार्यकारी अभियंता मिळालेला नव्हता.

दरम्यान, पहिल्या आठवड्यातच बुलढाणा जिल्हा परिषदेच्या चिखली पंचायत समितीमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत असलेले एस. वारे यांचे नगर जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता म्हणून आदेश निघाले होते.

सात दिवसांत आदेश रद्द झाल्याची घटना ताजी..!
मध्यंतरी बांधकाम विभागातील एका बड्या अधिकार्‍याचे डिसेंबर मध्येच मुंबईकडे बदलीचे आदेश निघाले होते. या आदेशात संबंधित अधिकार्‍याच्या मागच्या चौकश्यांचाही उल्लेख होता. त्यामुळे तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे या आदेशात नमूद होते. मात्र, सात दिवसांतच ‘जादुची ‘राजकीय’ कांडी फिरली’ आणि संबंधित आदेश रद्द झाला. पुढे ‘ते’ महाशय काही काळ झेडपीतच थांबल्याचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे ‘वारे’प्रकरणालाही राजकीय झालर आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Back to top button