

नगर; पुढारी वृत्तसेवा : एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या वन विभागातील लिपिकाचे कार्ड हातसफाईने बदलून नंतर एटीएममधून 43 हजार काढून फसवणूक केल्याची घटना घडली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे वन विभागातील लिपिकाने तोफखाना पोलिस ठाण्यात दोन अज्ञात भुरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे.
दिलीप दादाराव चिरके (रा.सुभाषनगर, ता.बार्शी, जि. सोलापूर) यांच्या एटीएममधून 43 हजार 360 रूपये काढल्याचा मेसेज आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. शिर्डी ते नगर असा प्रवास करत असताना पैसे लागत असल्याने तेे शनिवारी (दि.10) नगर-मनमाड रोडवरील एसबीआय बँकेच्या एटीएमवर थांबले होते. एटीएममध्ये पैसे काढत असताना त्यांच्या मागे दोन व्यक्ती उभे होते.
फिर्यादी यांना ते म्हणाले की, लवकर आवरा आम्हाला पैसे काढायचे आहेत, तुम्ही चूकीचे बटन दाबत आहात म्हणून वेळ लागत आहे. त्यानंतर एकाने एटीएम मशीनमधून काढले व पुन्हा फिर्यादीच्या हातात दिले. त्यानंतर पैसे निघाले नाहीत व एटीएम ब्लॉक असल्याचे स्क्रिनवर दिसले. तसेच कोहिनूर मॉल येथे शॉपिंग केल्यानंतर बिल देताना एटीएम ब्लॉक असल्याचे त्यांना सांगण्यात आले. नंतर फिर्यादी हे बार्शी येथे घरी गेले. रविवारी सकाळी त्यांनी मोबाईल पाहिला असता त्यांच्या खात्यातून 43 हजार 360 रूपये काढल्याचा मेसेज त्यांना दिसला. फिर्यादी यांनी एटीएम पाहिले असता ते त्यांचे नव्हते.